आकोट/ पोपटखेड: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटकडे आगेकूच केली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावकऱ्यांनी पोपटखेड गेट पार करून जंगलात प्रवेश केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वन विभागाचा व पोलिसांचा ताफा तैनात होता; परंतु आपल्या हक्क मागणीकरिता एकवटलेले ग्रामस्थ थेट खटकाली गेटपर्यंत पोहचले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नागरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपाणी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनामुळे शेतजमीन गेली, उपजीविकेचे साधन नाही. शिवाय वातावरण मानवत नसल्याने विविध आजाराने २७४ पुनर्वसित ग्रामस्थांचा मृत्यू झाला. आतापर्यंत करण्यात आलेल्या कोणत्याही मागण्यांची पूर्तता न झाल्याने आमच्या जुन्या गावी परत जात आहोत. आता मेलो तरी जंगलातून बाहेर निघणार नाही. कोणी आता आश्वासने देऊ नये, शासनावर व अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नाही. आमचे रेशनपाणी आणण्याकरिता रस्ता मोकळा करून द्यावा, अशा आशयाचे निवेदन उपवनसंरक्षक कार्यालयात सोमवारी सकाळी दिले. त्यानंतर केलपाणी येथे एकत्र आलेल्या ५०० ते ६०० ग्रामस्थांनी वन विभागाच्या पोपटखेड गेटवर पोहचले. या ठिकाणी त्यांना वन विभाग व पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेट पायदळी तुडवित आतमध्ये प्रवेश घेतला. सोबत उदरनिर्वाहाचे साधन, मुलेबाळे व काही जणांनी जनावरेसुद्धा सोबत घेऊन जुन्या गावाची वाट धरली. यावेळी उपवनसंरक्षक देवला यांनी आपली नव्यानेच या ठिकाणी नियुक्ती झाली आहे, त्यामुळे थोडा वेळ द्या, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामस्थांनी यापूर्वी असलेल्या उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांनीसुद्धा आम्हाला असेच आश्वासन दिले. त्यांची बदली झाली; परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्या गावी परतण्याच्या निर्धारावर कायम राहिले. यावेळी घटनास्थळावर उपवनसंरक्षक देवला, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, पोलीस उपनिरीक्षक शहाजी रूपनर तसेच वन विभागाचा ताफा, ग्रामीण पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. दरम्यान, जंगलात घुसलेल्या पुनर्वसित गावकºयांनी पोपटखेड गेट पार केल्यानंतर आपला पहिला पडाव खटकाली गेटसमोर टाकला आहे. दरम्यान, पुनर्वसित गावकरी व वन विभाग, पोलीस यांच्यात संघर्षाची स्थिती असल्याचे वृत्त बाहेर येत आहे.