प्रादेशिक संचालकांनी घेतला परिमंडळाचा आढावा

By Admin | Updated: May 13, 2017 18:51 IST2017-05-13T18:51:28+5:302017-05-13T18:51:28+5:30

ऊर्जा मंत्र्यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी : ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या सूचना

Regional Director Reviewed the Region | प्रादेशिक संचालकांनी घेतला परिमंडळाचा आढावा

प्रादेशिक संचालकांनी घेतला परिमंडळाचा आढावा

ऊर्जा मंत्र्यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी : ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या सूचना
अकोला : राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुढील आठवड्यात अकोला व वाशिम जिल्हय़ाच्या दौर्‍यावर येत असल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी अकोला परिमंडळाचा आढावा घेतला. गुरुवारी वाशिम येथे, तर शुक्रवारी अकोला येथे बैठका घेऊन त्यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी व इतर कामांची माहिती घेऊन वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासोबतच थकबाकी वसुलीवर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या.
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ मे रोजी वाशिम, तर १९ मे रोजी अकोला येथे येणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते दोन्ही ठिकाणी जनता दरबार भरवून वीज ग्राहकांसोबत संवाद साधणार आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या या दौर्‍यापूर्वी प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी वाशिम व अकोला येथे भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना विविध सूचना केल्या. सर्वच प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे आदेश त्यांनी दिले, तसेच वीज चोरीला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्या, कृषी पंपाच्या प्रलंबित जोडण्याचे अर्ज तातडीने निकाली काढा, कामांचा प्राधान्यक्रम ठरवा, अशा विविध सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकींना मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Regional Director Reviewed the Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.