बनावट पावत्यांच्या आधारे देणगीसाठी वसुली
By Admin | Updated: April 15, 2015 01:37 IST2015-04-15T01:37:47+5:302015-04-15T01:37:47+5:30
१0 लाखांची फसवणूक, न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल.

बनावट पावत्यांच्या आधारे देणगीसाठी वसुली
अकोला - मानेक टॉकीज परिसरातील एका मशिदीच्या मालमत्तेचे भाडे व विकासकार्याच्या नावाखाली बनावट पावत्यांच्या आधारे देणगी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. मशीदच्या माजी अध्यक्षांनीच हा प्रताप केला असून, सुमारे १0 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशावरून रामदासपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मानेक टॉकीज परिसरात नगीना मशीद असून, सन २00३ ते २0१३ या १0 वर्षांच्या कार्यकाळात मशीद ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून माळीपुरा परिसरातील रहिवासी जहिरुद्दीन निजामुद्दीन यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर वक्फ बोर्डच्या आदेशानंतर २0१३ मध्ये नगीना मशीद ट्रस्टची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. नवीन कार्यकारिणीकडून २00३ ते २0१३ या १0 वर्षांतील लेखाजोखा मागितली असता, जहिरुद्दीन यांनी हा लेखाजोखा देण्यास टाळाटाळ केली. १0 वर्षांच्या काळातील लेखाजोखा देण्यात यावा, यासाठी त्यांना नोटीसही देण्यात आली; मात्र त्यांनी लेखाजोखा दिला नाही. या प्रकरणी शफिक अहमद खान यांनी माहिती घेतली असता, ट्रस्टचे माजी अध्यक्ष जहिरुद्दीन यांच्याकडे पद नसताना त्यांनी ट्रस्टच्या मालमत्तेचे भाडे वसूल करण्यासाठी बनावट पावत्यांचा वापर करून वसुली सुरूच ठेवली तसेच विकासकार्यासाठी बनावट पावत्यांवर देणगी मागितल्याचे समोर आले. यामध्ये त्यांनी सुमारे १0 लाख रुपयांची वसुली केल्याची तक्रार शफिक अहमद यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात नमूद केली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.