‘बीडीओं’वर कारवाईची शिफारस
By Admin | Updated: August 20, 2016 02:47 IST2016-08-20T02:47:36+5:302016-08-20T02:47:36+5:30
अकोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सातत्याने अनुपस्थित राहणा-या गटसमिती अधिका-यांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

‘बीडीओं’वर कारवाईची शिफारस
अकोला, दि १९: स्थायी समितीच्या सभेला प्रत्येक सभेला जिल्हय़ातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी (बीडीओ) गैरहजर राहत असल्याच्या मुद्दय़ावर शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, कारवाईची मागणी केली. त्यानुसार सभेला गैरहजर राहणार्या जिल्हय़ातील बीडीओंवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस करण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आदेश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेला जिल्हय़ातील पंचायत समितींचे गटविकास अधिकारी हजर का राहत नाही, असा प्रश्न सदस्य विजय लव्हाळे, शोभा शेळके यांनी सभेत उपस्थित केला. सभेला वारंवार गटविकास अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या मुद्दय़ावर समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आक्रमक पवित्रा घेतला तसेच यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार स्थायी समितीच्या प्रत्येक सभेला गैरहजर राहणार्या जिल्हय़ातील सातही ह्यबीडीओंह्णवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान स्थायी समितीच्या सभेला वारंवार गैरहजर राहणार्या जिल्हय़ातील ह्यबीडीओंह्णवर कारवाई करण्यासाठी शिफारस करण्याचा ठराव सभेत मंजूर झाल्यानंतर, लगेच जिल्हय़ातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी (बीडीओ ) व सहायक गटविकास अधिकारी (एबीडीओ) सभागृहात हजर झाले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केव्हा करणार, याबाबत सभेत विचारणा करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, सोमवार, २३ ऑगस्ट रोजी पंचायत समिती स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी उन्हाळे यांनी सभेत दिली.
कृषी विभागाच्या योजनेंतर्गत लाभार्थी याद्या मंजूर करण्यात आल्या; मात्र साहित्य वाटपाचे काय झाले, असा प्रश्न सदस्य रामदास लांडे यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे यांच्यासह समितीचे सदस्य विजय लव्हाळे, शोभा शेळके, दामोदर जगताप, रामदास लांडे, डॉ. हिंमत घाटोळ, गजानन उंबरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सभेचे सचिव विलास खिल्लारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बीडीओंकडून मागविणार खुलासा-डीसीईओ
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला वारंवार गैरहजर राहिलेल्या जिल्हय़ातील पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या सभेला आतापर्यंत गैरहजर का राहिले, याबाबत उत्तर मागविण्यात येणार आहे, अशी माहिती सभेचे सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डीसीईओ) विलास खिल्लारे यांनी सभेत दिली.