उष्माघाताने मृत्यू झाल्यास मदतीची शिफारस
By Admin | Updated: January 28, 2016 21:01 IST2016-01-28T21:01:57+5:302016-01-28T21:01:57+5:30
ठरावासंबंधी विभागीय आयुक्तांनी मागितले जिल्हाधिका-यांकडून अभिप्राय

उष्माघाताने मृत्यू झाल्यास मदतीची शिफारस
संतोष येलकर/अकोला: नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू होणार्यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक मदत देण्याची शिफारस विधानसभेच्यावतीने शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडण्यात येणार्या ठरावासंबंधी शासनामार्फत विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
जळगाव आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेचा उच्चांक गाठला जातो. कडाक्याचे ऊन सहन न झाल्याने मृत्यूच्या घटना होतात. गत दोन-तीन वर्षांपासून उष्माघाताने झालेले मृत्यू विचारात घेता, ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात यावी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ज्याप्रमाणे शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते, त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक मदत देण्याची शिफारस विधानसभा शासनाकडे करणार आहे. यासंबंधी आ. कुणाल पाटील यांचा ठराव विधानसभेत मांडण्यासाठी अध्यक्षांनी स्वीकृत केला आहे. या पृष्ठभूमीवर यासंबंधीचा अभिप्राय सादर करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल विभागाचे कक्ष अधिकारी सु.श. बोकडे यांनी २६ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुषंगाने सविस्तर अभिप्राय तातडीने सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना २८ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे दिले आहेत.
संबंधित विभागांकडून माहितीच्या आधारे अभिप्राय सादर करा!
उष्माघाताने झालेले मृत्यू ही नैसर्गिक आपत्ती समजण्यात यावी, यासंदर्भात विधानसभेत मांडण्यात येणार्या ठरावाच्या दृष्टीने आरोग्य विभागासह संबंधित विभागांकडून सविस्तर माहिती घेऊन, त्याआधारे अभिप्राय सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतामाळ या पाच जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. जिल्हाधिकार्यांकडून सादर करण्यात येणारे अभिप्राय विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत.