मान्यता एका गावात; शाळा भरते दुस-या गावात!

By Admin | Updated: November 23, 2015 01:10 IST2015-11-23T01:10:48+5:302015-11-23T01:10:48+5:30

वाशिम जिल्ह्यातील प्रकार,शिक्षण विभागातील सावळागोंधळ उघड.

Recognition in a village; School fills in another village! | मान्यता एका गावात; शाळा भरते दुस-या गावात!

मान्यता एका गावात; शाळा भरते दुस-या गावात!

संतोष वानखडे / वाशिम : स्थलांतरणाचा नियम धाब्यावर बसवून, वाशिम तालुक्यातील एका शिक्षण संस्थेने धुमका येथे मान्यता असलेली खासगी माध्यमिक शाळा चक्क बोराळा शिवारात थाटली असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारीने समोर आणला आहे. या प्रकाराने शिक्षण विभागातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणला असून, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या विषयात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागातील कथित शिक्षक व लिपिक पदभरतीच्या गैरप्रकाराची शाई वाळते न वाळते तोच जिल्ह्यातील काही शाळा स्थलांतरणाचा नियम डावलून दुसर्‍या ठिकाणी सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. कथित पदभरतीने वाशिम येथील दोन तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांना फौजदारी कारवाई व निलंबनाच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. आता काही शाळांची मान्यता एका ठिकाणी आणि त्या दुसर्‍या ठिकाणी भरत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
वाशिम येथील श्री संत पांडुरंग महाराज शिक्षण प्रसारक संस्था अंतर्गत स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय १९९९ पासून सुरू आहे. या विद्यालयाची मान्यता धुमका येथे आहे. नियमानुसार मान्यता असलेल्या ठिकाणी शाळा सुरू ठेवणे गरजेचे आहे. एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी शाळा स्थलांतरित करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते. शिक्षण विभागाची परवानगी न घेता स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमक्याऐवजी बोराळा शिवारात सुरू आहे. हा प्रकार सन २000 पासून सुरू असतानाही शिक्षण विभागाचे याकडे लक्ष जाऊ नये, ही गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेत या प्रकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. शिक्षण विभाग काय अहवाल सादर करतो, यावर या शाळेचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Recognition in a village; School fills in another village!