अकोला मनपाच्या मराठी शाळा क्र.२६ मध्ये इयत्ता नववीच्या तुकडीला मान्यता
By Admin | Updated: July 3, 2014 01:41 IST2014-07-03T01:37:45+5:302014-07-03T01:41:29+5:30
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची मंजुरी; शिक्षण विभागासाठी ऐतिहासिक निर्णय.

अकोला मनपाच्या मराठी शाळा क्र.२६ मध्ये इयत्ता नववीच्या तुकडीला मान्यता
आशीष गावंडे /अकोला
महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी मैलाचा दगड ठरणार्या महत्त्वपूर्ण निर्णयाची प्रतीक्षा अखेर संपली. मराठी मुलांची शाळा क्र.२६ मध्ये चालू शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववीच्या तुकडीला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी मंजुरी दिली. बुधवारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवांनी इयत्ता नववीच्या तुकडीला मान्यता दिल्याने इयत्ता दहावीचा मार्ग सुकर झाला आहे.
महापालिकेच्या ५५ शाळांमध्ये मराठी, उर्दू व हिंदी माध्यमाचे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. यामध्ये शिवसेना वसाहत, खदान व नायगाव परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या आहे. शिवसेना वसाहतमधील मनपा मराठी मुलांची शाळा क्र.२६ मध्ये इयत्ता आठवी पर्यंंतच्या तुकडीला मान्यता आहे; परंतु शाळेमध्ये गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या लक्षात घेता, काँग्रेसचे गटनेता दिलीप देशमुख यांनी इयत्ता नववी व दहावीच्या तुकडीला मान्यता मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडे सतत पाठपुरावा केला. त्यानुसार ३ जुलै २0१३ रोजीच्या सर्वसाधारण सभेत शाळा क्र.२६ मध्ये इयत्ता नववीच्या तुकडीला मंजुरी देण्याचा ठराव पारित करण्यात आला. तब्बल वर्षभर हा प्रस्ताव अडगळीत पडून होता. यादरम्यान मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हा प्रस्ताव १६ मे २0१४ रोजी शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्याकडे सादर केला. शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संचालक विभाग (माध्यमिक) यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रस्तावाच्या प्रवासाला खर्या अर्थाने गती आली. ३0 जून रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिवांकडे हा प्रस्ताव पोहचताच, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. बुधवारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी इयत्ता नववीच्या तुकडीला मान्यता दिली. अर्थातच विद्यार्थ्यांंच्या नैसर्गिक वाढीनुसार इयत्ता दहावीच्या तुकडीला आपसूकच मान्यता मिळणार असल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांंची शैक्षणिक अडचण दूर झाली आहे.