बापूनगरात सुदर्शन महाराजांच्या प्रतिमेची विटंबना

By Admin | Updated: December 13, 2014 00:45 IST2014-12-13T00:45:32+5:302014-12-13T00:45:32+5:30

सुदर्शन समाजातील नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या.

Rebellion of the image of Sudarshan Maharaj in the city of Baburagar | बापूनगरात सुदर्शन महाराजांच्या प्रतिमेची विटंबना

बापूनगरात सुदर्शन महाराजांच्या प्रतिमेची विटंबना

अकोला : आपातापा रोडवरील बापूनगरामधील सुदर्शन महाराजांचे छायाचित्र असलेला फलक अज्ञात समाजकंटकाने फाडून, त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सुदर्शन समाजातील पुरुष व महिलांनी आकोट फैल पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, समाजातील काही युवकांनी रास्ता रोको करण्याचादेखील प्रयत्न केला. या घटनेमुळे बापूनगर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बापूनगरात राहणारे सतीश सज्जन घमेरिया (२२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आपातापा रोडवरील एका चौकामध्ये सुदर्शन समाजाचे आराध्य दैवत सुदर्शन महाराज यांची प्रतिमा लावलेली आहे. ही प्रतिमा चार वर्षांपूर्वी समाजातील युवकांनी याठिकाणी लावली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने या प्रतिमेची नासधूस करून ती फाडली. त्यामुळे सुदर्शन महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली. सतीश घमेरिया यांच्या तक्रारीनुसार, आकोट फैल पोलिसांनी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध भादंवि कलम २९५ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सुदर्शन समाजातील शेकडो महिला-पुरुष व युवकांनी आकोट फैल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि ठिय्या दिला. या प्रकारामुळे काहीकाळ बापूनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळाची पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आकोट फैलचे ठाणेदार प्रकाश निघोट यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सुदर्शन समाजातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

Web Title: Rebellion of the image of Sudarshan Maharaj in the city of Baburagar