कॉँग्रेस, राकॉँ, भारिपमध्ये बंडखोरी

By Admin | Updated: October 2, 2014 01:56 IST2014-10-02T01:56:21+5:302014-10-02T01:56:21+5:30

राजकीय समीकरण बदलणार : मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला पूर्व मतदारसंघ.

Rebellion in Congress, Rakon, Bharipch | कॉँग्रेस, राकॉँ, भारिपमध्ये बंडखोरी

कॉँग्रेस, राकॉँ, भारिपमध्ये बंडखोरी

राजरत्न सिरसाट / अकोला
विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना बंडखोरांनी आव्हान दिले असून, अशीच बंडखोरी भारिप- बमसंमध्येही उफाळून आली आहे. युतीतील घटक पक्षातील नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने या तिन्ही मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १ ऑक्टोबर, या एका दिवसाची मुदत होती. निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप झाले असून, उमेदवारांनी प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात केली आहे; परंतु बंडखोरांचे बंड थोपविण्यात राजकीय पक्षांना अपयश आल्याने मूर्तिजापूर, बाळापूर व अकोला पूर्व या मतदारसंघात तगड्या अपक्ष उमेदवारांचा सामना राजकीय पक्षांच्या उमेदवारांना करावा लागणार आहे. मूर्तिजापूर या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांनी दंड थोपटले असून, या मतदारसंघात त्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा आहे.
बाळापूर मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून, काँग्रेसचे नेते नारायण गव्हाणकर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत इतर उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. ते कृ णबी समाजाचे असून, या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सामाजिक, राजकीय समीकरण कोणाला विधानसभेत पाठविते, हे पाहण्यासाठी १९ ऑक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बाळापूर मतदारसंघातच भाजपाचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम या पक्षाचे उमेदवार संदीप पाटील लोड यांनी अपक्ष म्हणून, रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीने येथे उमेदवार दिला असताना शेतकरी कामगार पक्षाचे प्रदीप देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या आघाडीवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. या मतदारसंघात भारिप-बमसंचे सुरेंद्र खंडारे यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे.
अकोला पूर्व या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. भारिप-बमंसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पा इंगळे यांनी या मतदारसंघात उमेदवारी कायम ठेवली आहे. अपक्ष उमेदवार विजय मालोकार यांची उमेदवारीही या मतदारसंघामध्ये निर्णायक ठरू शकते. भाजप व घटक पक्षांची युती असताना अकोला जिल्हय़ातील बाळापूर व अकोला पूर्व या मतदारसंघात भाजपाला घटक पक्षाच्या उमेदवारांनीच आव्हान दिले आहे. भाजपासोबत रिपाइं (आठवले)ची युती आहे; परंतु अकोला पूर्व मतदारसंघात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांनी, तर बाळापुरात शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

Web Title: Rebellion in Congress, Rakon, Bharipch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.