अडकलेल्या नागरिकांना परत पाठविण्याची तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:25 IST2020-05-03T10:25:39+5:302020-05-03T10:25:48+5:30
नागरिकांना संपूर्ण माहितीसह ‘आॅनलाइन’ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे.

अडकलेल्या नागरिकांना परत पाठविण्याची तयारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर नागरिकांना संपूर्ण माहितीसह ‘आॅनलाइन’ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, गत २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर परराज्यातील मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती जिल्ह्यातील विविध भागात अडकले आहेत. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून बाहेर जाणाºया मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना आपल्या संपूर्ण माहितीचा आॅनलाइन भरलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘लिंक’वर सादर करणे आवश्यक आहे.
आॅनलाइन अर्ज सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत संबंधित जिल्हा प्रशासन व राज्य शासनासोबत संपर्क साधण्यात येणार असून, ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तींना त्यांच्या गावी पाठविण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून बाहेर जाणाºया व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या ‘लिंक’वर आॅनलाइन संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
‘आॅनलाइन’ अर्जात द्यावयाची अशी आहे माहिती!
जिल्ह्यातून राज्याबाहेर व राज्यांतर्गत जाण्यासाठी परवानगी मिळण्यासंदर्भात आॅनलाइन अर्जामध्ये संबंधित व्यक्तींना संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, निवासाचा पत्ता, तालुका, मोबाइल क्रमांक, विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे का, वैद्यकीय तपासणीचा दिनांक, इतर कुठले आजार आहेत का, प्रवास कोणत्या गावापर्यंत करावयाचा आहे, संबंधित जिल्ह्याचे व राज्याचे नाव, ज्या वाहनाने प्रवास करणार आहे, त्या वाहनाचा क्रमांक, खासगी वाहन असल्यास चालकाचे नाव, संपूर्ण पत्ता व मोबाइल क्रमांक आणि प्रवास करणाºया एकूण व्यक्तींची संख्या इत्यादी प्रकारची माहिती आॅनलाइन अर्जात सादर करावयाची आहे.