शिधापत्रिकाधारक राहणार धान्यापासून वंचित
By Admin | Updated: July 29, 2014 20:19 IST2014-07-29T20:19:57+5:302014-07-29T20:19:57+5:30
जुलै महिन्याचे नियतन नामंजूर

शिधापत्रिकाधारक राहणार धान्यापासून वंचित
मूर्तिजापूर: अन्न-धान्य ही माणसाची मूलभूत गरज असून, प्रत्येकाला महिन्याकाठी स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी शासनावर आहे. तथापि, तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचे जुलै महिन्याचे नियतन नामंजूर झाल्यामुळे या महिन्यातील धान्य वितरित होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय घटनेने अन्न या घटकाला माणसाची मूलभूत गरज म्हणून मान्यता दिली आहे. शासनस्तरावर नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीच्या निकषांवर बीपीएल, एपीएल, अंत्योदय अशी विभागणी करून दर महिन्याला धान्य वाटप केले जाते. गत अनेक वर्षांपासून धान्य वाटपाचे नियतन सरकारी स्वस्त दुकानांमार्फत सुरूआहे; परंतु गत दोन महिन्यांपासून धान्य वाटपामध्ये अनियमितता होत आहे. गत जून महिन्यात जिल्हा पुरवठा विभागाकडून धान्याचा अल्प पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश सरकारी धान्य दुकानदारांना धान्याची उचल करता आली नाही. निम्म्यापेक्षा अधिक दुकानदारांना धान्य न मिळाल्यामुळे त्याचे वाटप गरीब जनतेला होऊ शकले नाही. चालू महिन्यात अर्थात जुलै महिन्यातही धान्य मिळणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. दर महिन्याचे धान्य नियतन हे १५ तारखेपूर्वी व्हायला हवे; परंतु जुलै महिन्याची २५ तारीख उलटून गेली असली तरी अद्यापपर्यंत मूर्तिजापूर धान्य पुरवठा विभागाकडून नियतन मंजूर न झाल्यामुळे या महिन्याचे धान्य वितरित होणार नसल्याची चिन्हे आहेत. शासनाने मोठा गाजावाजा करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लागू केली. या योजनेत प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप होणे अपेक्षित होते; परंतु तसे होत नसल्यामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.