शिधापत्रिका-आधार ‘लिंक’ची पडताळणी सुरू !
By Admin | Updated: June 17, 2017 01:31 IST2017-06-17T01:31:53+5:302017-06-17T01:31:53+5:30
‘ई-पॉस’ द्वारे १ जुलैपासून होणार धान्याचे वितरण

शिधापत्रिका-आधार ‘लिंक’ची पडताळणी सुरू !
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १ जुलैपासून ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या शिधापत्रिकांच्या पडताळणीचे काम अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत सुरू आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दरमहा स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्य वितरीत करण्यात येते. शासनाच्या पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार १ जुलैपासून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस ’ मशीनद्वारे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) असणे आवश्यक आहे. त्यानुसार शिधापत्रिका आधारक्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम ८५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, १ जुलैपासून पासून ‘ई-पॉस ’ मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करावयाचे असल्याच्या पृष्ठभूमीवर आधार क्रमांकाशी ‘लिंक’करण्यात आलेल्या शिधापत्रिका, शिधापत्रिकामधील समाविष्ट लाभार्थींचा आधार क्रमांक, शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणाचा लाभ, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय योजना या योजनांपैकी शिधापत्रिकाधारकांचा कोणत्या योजनेत समावेश आहे, यासंदर्भात माहिती पडताळणीचे काम पुरवठा विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सुरू आहे.
शासनाच्या आदेशानुसार १ जुलैपासून ‘ई-पॉस’ मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्यात आलेल्या शिधापत्रिका, त्यामधील त्रुटी, योजनानिहाय लाभार्थी शिधापत्रिकाधारकांचा समावेश यासंदर्भात पडताळणीचे काम सध्या सुरू आहे.
-अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.