शिवाजी ठाकरेसह राठोडला सशर्त जामीन
By Admin | Updated: February 11, 2015 01:25 IST2015-02-11T01:25:27+5:302015-02-11T01:25:27+5:30
पाच लाखांचे लाचप्रकरण; महिनाभर लावावी लागणार एसीबी कार्यालयात हजेरी.

शिवाजी ठाकरेसह राठोडला सशर्त जामीन
अकोला : खोट्या गुन्हय़ात अडकविण्याची भीती दाखवून ५ लाखांची लाच स्वीकारणारा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक शिवाजी अवधूत ठाकरे व त्याचा रायटर भीमराव राठोड याला खामगाव विशेष न्यायालयाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अकोला कार्यालयामध्ये महिनाभर दर मंगळवारी हजेरी लावावी लागणार आहे.
फसवणुकीच्या गुन्हय़ामध्ये कारवाई टाळण्यासाठी साखरखेर्डा येथील शेख शफी यांना पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे व पोलीस शिपाई भीमराव राठोड यांनी १0 लाखांची लाच मागितली. सुरुवातीला शफीने त्यांना दीड लाख रुपये दिले. ६ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे त्याच्याकडून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजी ठाकरे अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकला. औरंगाबाद येथील गुन्हे शाखेचा पोलीस शिपाई भीमराव राठोड हादेखील या गुन्हय़ात सहभागी होता. राठोड मंगळवारी पोलिसांना शरण आला. दोघाही लाचखोरांना खामगाव विशेष न्यायालयात हजर केले असता, आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी करून, नंतर जामीन मंजूर केला.