राठोड, केसरी, नासीरवर कारवाईची टांगती तलवार
By Admin | Updated: December 23, 2014 00:54 IST2014-12-23T00:48:15+5:302014-12-23T00:54:35+5:30
चौकशी अहवालात तिघांवर ठपका, महिला अधिका-यांचा छळ व नियमबाहय़ प्रतिनियुक्तीचे प्रकरण.
_ns.jpg)
राठोड, केसरी, नासीरवर कारवाईची टांगती तलवार
सचिन राऊत /अकोला
लोकसेवा आयोगामार्फत शासकीय सेवेत असलेल्या महिला अधिकार्यांचा मानसिक छळ करणे, तसेच साहाय्यक संचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या कर्मचार्यांच्या नियमबाहय़ प्रतिनियुक्त्यांची चौकशी आटोपली असून, या चौकशी अहवालामध्ये साहाय्यक संचालक हिवताप डॉ.एम. एम. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी हनुमानप्रसाद केसरी व नासीर हुसेन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. प्राथमिक स्वरूपात हे तिघेही दोषी असून, त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. ह्यलोकमतह्णने हा प्रकार उजेडात आणताच सदर प्रकरणाची गंभीर देखल घेऊन ही चौकशी करण्यात आली होती.
साहाय्यक संचालक हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला अधिकार्याचे कुठलेही कारण नसताना वेतन रोखणे, द्विअर्थी शब्दात त्यांच्याशी बोलणे, वारंवार फोन करून मानसिक छळ करणे, तक्रार केल्यास वाईट परिणाम होतील, अशा शब्दात धमकी दिल्याप्रकरणी विशाखा समितीकडून साहाय्यक संचालक डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी हनुमानप्रसाद केसरी व नासीर हुसेन यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी अहवालामध्ये तिघांवरही ठपका ठेवून त्यांना प्राथमिक स्वरूपात दोषी ठरविण्यात आले असून, हा चौकशी अहवाल आरोग्य संचालक मुंबई व सहसंचालक पुणे यांच्याकडे येत्या दोन दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे. यासोबतच पाचही जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात झालेल्या नियमबाहय़ प्रतिनियुक्त्यांची चौकशी करण्यात आली असून, या चौकशीमध्येही डॉ. राठोड, केसरी हे दोघेही दोषी आढळून आले आहे.
हा चौकशी अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आरोग्य सेवेचे सहसंचालक पुणे यांच्याकडे पाठविला असून, सहसंचालक पुणे यांनी साहाय्यक संचालक हिवताप डॉ. एम. एम. राठोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य संचालक मुंबई यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात आता तिघांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आरोग्य उपसंचालक व विशाखा समितीने दखल घेऊन तत्काळ चौकशी सुरू केली. या गंभीर प्रकरणाची चौकशी आटोपली असून, तिघांवरही दोषी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.