खंडेलवाल ज्वेलर्स (केजे २) मधील युवकाने केला युवतीवर बलात्कार
By Admin | Updated: July 30, 2014 01:13 IST2014-07-30T01:13:40+5:302014-07-30T01:13:40+5:30
लग्नाचे नाटक करून केले शारीरिक संबंध प्रस्थापित

खंडेलवाल ज्वेलर्स (केजे २) मधील युवकाने केला युवतीवर बलात्कार
अकोला: प्रसिद्ध सराफा व्यावसायिक नितीन खंडेलवाल यांच्या रतनलाल प्लॉट येथील खंडेलवाल ज्वेलर्स (केजे २) मध्ये काम करणारा मोहनिश अनिल खंडेलवाल (२८) याने ज्वेलर्समध्येच काम करणार्या २३ वर्षीय युवतीसोबत लग्नाचे नाटक करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला. खंडेलवाल ज्वेलर्स (केजे २) मध्ये काम करणार्या युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती गत २0१0 पासून प्रसिद्ध सराफा व्यवसायी नितीन खंडेलवाल यांच्या प्रतिष्ठानामध्ये काम करते. याच प्रतिष्ठानामध्ये इटारसी येथील मोहनिश अनिल खंडेलवाल हासुद्धा काम करतो. येथेच दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या. मोहनिश खंडेलवाल याने तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. मोहनिश युवतीला २0१२ मध्ये रामटेक येथे घेऊन गेला होता. तेथील राम मंदिरात एका मित्राच्या साक्षीने दोघांनी विवाह केला. त्यानंतर मोहनिश याने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, युवतीने मोहनिश याच्याकडे सासरी नेण्याचा आग्रह धरला; परंतु काहीतरी कारण सांगायचा आणि विषय मोडायचा. मोहनिश याने २६ जुलै रोजी युवतीला इटारसी येथे एका हॉटेलमध्ये बोलाविले. या ठिकाणीही त्याने तिच्यावर बलात्कार केला. युवतीने त्याला घरी नेण्याचा आग्रह धरला. तेव्हा त्याने तिच्यासोबत वाद घालत, तुझा-माझा संबंध नाही. मी तुझ्यासोबत लग्नाचे नाटक केल्याचे सांगत, तुझ्याने जे होईल ते कर, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात येताच तिने मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास मोहनिशवर भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला.