रणधीर सावरकरांवर मुंबईत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 02:31 IST2017-05-30T02:31:33+5:302017-05-30T02:31:33+5:30

बांधकाम व्यावसायिकाच्या फसवणुकीचा आरोप : पोहरे पिता-पुत्राचाही समावेश

Randhir Savarkar filed a complaint in Mumbai | रणधीर सावरकरांवर मुंबईत गुन्हा दाखल

रणधीर सावरकरांवर मुंबईत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांधकाम व्यावसायिकाची साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून, अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे, त्यांचे चिरंजीव ऋषीकेश पोहरे आणि बळवंत महल्ले यांच्यावर येथील विक्रोळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सचिन काळे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेंच्या तक्रारीनुसार, ‘मेसर्स धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’ या कंपनीने मुंबईतील विक्रोळी पूर्वमधील कन्नमवार नगर-२ येथील ‘रायगड को.आॅप. हाऊसिंग सोसायटी’च्या पुनर्विकासाचे काम मिळविले होते. ‘मेसर्स धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’चे भागीदार असलेले सुरेश मोरे यांनी, काळे यांच्या ‘मेसर्स धनलक्ष्मी बिल्डटेक’ या कंपनीकडून या पुनर्विकास करावयाच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव मागवला. काळे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मोरे यांच्याकडून २ सप्टेंबर २०११ रोजी हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर मोरे यांनी दिलेल्या ‘वर्क आॅर्डर’नुसार काळेंनी कामाला सुरुवात केली.
दिनांक ६ मार्च २०१२ रोजी काळे यांनी ‘धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’ला पहिले बिल सादर केले. त्यावेळी ‘धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’तर्फे बळवंत महल्ले व आ. रणधीर सावरकर यांनी ‘अकोला अर्बन को. आॅप. बँक लिमिटेड’च्या काळबादेवी शाखेचा ४५ लाख ६२ हजार ६०० रुपयांचा धनादेश काळे यांना दिला. धनादेश देताना महल्ले यांच्या स्वाक्षरीचे ‘कव्हरिंग लेटर’ असल्याने त्यानंतरचे सर्व व्यवहार काळे यांनी महल्ले व त्यांच्या सहकाऱ्यांशी केले. काळे यांना सादर केलेल्या बिलांच्या केवळ निम्मीच रक्कम दिली जात होती. एकूण कामापैकी ८६ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, काळेंनी थकित साडेसहा कोटींबाबत सावरकर आणि महल्ले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी रक्कम कमी करून बिल पुन्हा सादर करण्यास सांगितले व पैसे देण्यास टाळाटाळ केली, असे काळे यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आ. सावरकर आणि महल्ले यांनी २३ जुलै २०१३ रोजी बांधकाम साईटवर धक्काबुकी करीत, आपल्याला तेथे जाण्यास मज्जाव केला आणि बंदुकीच्या धाकाने ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार काळे यांनी केली होती. त्यावरून विक्रोळी पोलिसांनी आ. सावरकर व महल्ले या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर काळे यांनी ‘मे. धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’बाबत माहिती अधिकारातून माहिती मिळवली असता, ‘मेसर्स धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’ या कंपनीचे सुरेश मोरे, रवींद्र कुळे, सोपान बोराडे हे तीनच भागीदार असल्याचे समोर आले. आ. सावरकर, प्रकाश पोहरे, ऋषिकेश पोहरे, अनुप धोत्रे व बळवंत महल्ले हे ‘धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’चे नोंदणीकृत भागीदार नसताना, त्यांनी ‘मे. धनलक्ष्मी एंटरप्रायझेस’ या नावाने ‘अकोला को. आॅप. बँकेमध्ये खाते उघडून, त्याद्वारे आर्थिक व्यवहार करीत आपली फसवणूक केल्याचे, काळे यांनी दिनांक २७ मे २०१७ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
काळे यांच्या तक्रारीनुसार साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक , तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यासाठी आ. सावरकर व प्रकाश पोहरे यांच्यासह एकूण पाच जणांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले.


कुणालाही फसविण्याचा आपण प्रकार कधीच केला नाही. तक्रारीत नेमके काय नमूद केले आहे, हे समजल्यावरच पुढे बोलता येईल.
- आ. रणधीर सावरकर

चुकीचा कंत्राटदार ठेवला की काय होऊ शकते, याचे हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. अशा भुरट्या चोऱ्या करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. न्यायालयात सिद्ध होईलच, खरे कोण आहे ते!
-प्रकाश पोहरे, संपादक, देशोन्नती

हे प्रकरण लवादाकडे दाखल असून, निकालानंतर जे सत्य आहे, ते बाहेर येईलच! या प्रकरणातील कंत्राटदार दबावतंत्राचा प्रयत्न करीत आहे.
-अनुप धोत्रे

Web Title: Randhir Savarkar filed a complaint in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.