मद्य विक्रेता कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: May 10, 2017 07:20 IST2017-05-10T07:20:23+5:302017-05-10T07:20:23+5:30
दीड महिन्यापासून दारू दुकान बंद झाल्याने परिवारावर उपासमारी ओढविली

मद्य विक्रेता कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अकोला: जिल्ह्यातील मद्य विक्रेता कामगारांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आणला. दीड महिन्यापासून दारू दुकान बंद झाल्याने परिवारावर उपासमारी ओढविली असून, रोजीरोटी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशा आशयाचे फलक घेऊन हा मोर्चा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या आंदोलकांनी आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गालगतचे मद्यविक्रीच्या दुकानांवर १ एप्रिलपासून बंदी घातली गेली. अकोल्यातही शेकडो देशी, विदेशी दारू दुकान बंद झालेत. या दुकानांमध्ये वर्षोगणतीपासून काम करणाऱ्या शेकडो परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ मद्य विक्री करणारेच नव्हे तर चकणा विक्रेता, कोल्ड्रिंग विक्रेता, पाणी पाऊज विक्रेता, बॉटल व्यावसायिक, हमाल यांच्यावरही अप्रत्यक्ष परिणाम पडला आहे. अकोल्यातील एका मद्य दुकानात किमान पाच कर्मचारी असून, या कर्मचाऱ्यांमागे त्यांचा परिवार आहे. मद्यविक्रीच्या माध्यमातून होत असलेल्या व्यवसायावर शेकडो परिवाराचे पोटदेखील अवलंबून असल्याचे या मोर्चातून अधोरेखित करण्यात आले.
स्थानिक अशोक वाटिकेतून निघालेला शेकडोंचा मोर्चा शहराला वेढा घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता धडकला. कडाक्याचे उन्ह असतानाही मोर्चात शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या हातात लक्षवेधी फलक होते. या मोर्चाचे नेतृत्व राजू कापशीकर, किशोर वानखडे, संदीप बोदडे, सचिन देशमुख, भारत इंगळे, पवन गायकवाड यांनी केले. मद्य विक्री कामगारांच्या परिवारातील महिला, मुले आणि इतर सदस्य सहभागी झाले होते.