वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यल्पच !
By Admin | Updated: August 2, 2014 23:12 IST2014-08-02T23:12:40+5:302014-08-02T23:12:40+5:30
वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून येते.

वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यल्पच !
वाशिम : जिल्हयात मृग नक्षत्रास सुरूवात झाल्यापासून दमदार पाऊसच न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी चार्यांसह विविध अडचणीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडल्याचे पर्जन्यमान अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर संपूर्ण महिन्यात एक दोन दा केवळ रिमझिम पावसाव्यतिरिक्त दमदार पाऊसचं झाला नाही. जुलै महिन्यात काही भागात पेरणीलायक पाऊस झाल्याने काही शेतकर्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने दांडी मारल्याने शेतकर्यांनी केलेल्या पेरणी तर वायाच गेली शिवाय ङ्म्रम व पैशाचे सुध्दा नुकसान झाले. काही भागात दुबार तर काही भागात तिबार पेरणी लहरी पावसामुळे शेरतकर्यांना करण्याची वेळ आली. वाशिम जिल्हयाचा संपूर्ण जुलै महिन्याच्या तालुकानिहाय पर्जन्यमानाच्या अहवालाचा अभ्यास केल्यास वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही फार कमी पाऊस पडल्याचे दिसते. गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत एकूण ३९८४ मि.मि. पावसाची नोंद असून सरासरी ६६४.00 आहे तर यावर्षी ३१ जुलैपर्यंत १४७८.८0 तर सरासरी २४६.४७ पाऊस झाला आहे. गतवर्षी माहे जुलैपर्यत तालुकानिहाय पडलेल्या पावसामध्ये वाशिम ६७७, मालेगाव ६२१, रिसोड ६१५, मंगरूळपीर ८३५, मानोरा ६८२ तर कारंजा ५५४ असा एकूण ३९८४ मि.मि. पाऊस पडला. तर यावर्षी जुलैपर्यंत वाशिम २३७.८0, मालेगाव २५६.८0, रिसोड १८५.00, मंगरूळपीर २५४.३0, मानोरा २३३.९0 तर कारंजा ३११ मि.मि. पाऊस पडला. यावर्षी पडलेल्या पावसाची टक्केवारी एकूण ५८.४0 असली तरी वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी ३0.८६ आहे. तालुकानिहाय वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता वाशिम, मालेगाव, रिसोड, मगरूळपीर, मानोरा, कारंजात अनुक्रमे २६.0९, ३0.५८, २४.६४, ३२.६५, ३0.७६, ४१.४२ मि.मि. पाऊस पडला आहे. पर्जन्यमान अहवालानुसार जुलैपर्यंत २५३२.२0 सरासरी अपेक्षित पाऊस होता मात्र प्रत्यक्षात १४७८.८0 चं पाऊस पडल्याने अनेक समस्या उभे राहण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.
** जिल्हयात गुरांच्या चार्याचा प्रश्न कायम
जिल्हयात पावसाची परिस्थीती पाहता भयावह परिस्थिती असून आतापासूनच गुरांच्या चार्याचा प्रश्न कायम झालेला आहे. अनेक संघटना, लोकप्रतिनिधींनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून जिल्हयात चारा डेपो उघडण्याची मागणी सुध्दा केली आहे. काही शेतकर्यांनी तर चक्क जनावरांना ढेप देण्यास सुरूवात केली आहे. समाधानकारक पाऊस न आल्यास शेतकर्यांवर जनावरे विकण्याची वेळ येवू शकते.
** मंगरूळपीर तालुक्यात आठ दिवसात चारा डेपो
मंगरूळपीर: तालुक्यात अत्यल्प प्रमाण झालेल्या पावसामुळे गुरांच्या चार्यांचा भिषण प्रश्न्न निर्माण झाली असुन चार डेपो चालु करण्या संदर्भा झालेल्या चर्चेत येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरू करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी दिनकर काळे यांनी दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वसंतराव पाटील शेगीकर यांनी दिली
** पाण्याच्या पातळीत घट
वाशिम शहरातील घरगुती बोअरवेलला अद्याप पाणी आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस न आल्याने पाण्याच्यापातळीत वाढ झालेली दिसून येत नाही. तसेच जिल्हयातील प्रकल्पातही पाण्याची पातळी वाढलेली दिसून येत नाही.
** २ ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात पडलेला पाऊस
वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व मालेगाव काहीच नाही. मानोरा 0५.00 मि.मि.; कारंजा 0९.00 मि.मि.; जिल्हयात एकूण १४.00 मि.मि.