दुस-या दिवशीही अवकाळी पाऊस
By Admin | Updated: March 28, 2016 01:49 IST2016-03-28T01:49:23+5:302016-03-28T01:49:23+5:30
वादळी वा-यासह गारपीट : पातूर, आकोट तालुक्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून एक ठार.

दुस-या दिवशीही अवकाळी पाऊस
अकोला/बोरगाव मंजू: जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला तालुक्यात सिसा बोंदरखेड येथे शेतात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीट झाली असून, तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले.
आठवडाभर कडक उन्हाचा सामना करणार्या अकोलेकरांना शनिवारपासून अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळपासून अनेक भागांमध्ये वादळी वार्यासह हलक्या सरी कोसळल्या. दुसर्या दिवशीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. त्यानंतर काही भागात वादळी वार्यासह पाऊस कोसळला. अकोला शहरात कौलखेड परिसरातील वर्धमाननगरमध्ये बाळू मोहड यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे जीन्याचा टॉवर तुटला.
तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे दुपारी वादळी वार्यासह पाऊस झाला. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारपासून अधूनमधून वादळी वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. शिर्ला येथे जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात दुपारी गारपीट झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. अकोला शहरातही काही परिसरात दुपारी हलकी सर येऊन गेली. मूर्तिजापूर शहरात दुपारच्या वेळी पाऊस झाला. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसा बोंदरखेड येथील शेतकरी किशोर नागोराव वडतकार (३५) हे आपल्या शेतात मशागतीकरिता बैलगाडी घेऊन गेले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे किशोर वडतकार हे बैलगाडी जुंपून घरी परत येण्यास निघाले. वाटतेच काळाने त्यांच्यावर झडप घातली. वीज अंगावर कोसळल्याने त्यांच्या बैलगाडीतच मृत्यू झाला. यानंतरही बैलगाडी घरापर्यंत आली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे, तलाठी हरिहर निमकंडे, ठाणेदार भास्कर तवर, जमादार अरुण गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. किशोर वडतकार यांच्याकडे एक एकर शेत असून, त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.