७ एप्रिलनंतर वादळासह बरसणार पाऊस
By Admin | Updated: March 29, 2016 02:06 IST2016-03-29T02:06:46+5:302016-03-29T02:06:46+5:30
हवामान खात्याचा अंदाज, फळबागांना धोका.

७ एप्रिलनंतर वादळासह बरसणार पाऊस
वाशिम: व-हाडात गत दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला, तरी आगामी पंधरवड्यात मात्र चांगलेच उन तापणार असून, ७ एप्रिलनंतर पुन्हा अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या भागातील फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्र बिघडले असून, परिणामी उन्हाळय़ातही पाऊस होत आहे. गत दोन दिवस वर्हाडात काही भागात पाऊस पडला. अमरावती विभागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळही आले. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच धांदळ उडाली. गत पंधरा दिवसांपासून कडक उन तापत असतानाच, अवकाळी पावसामुळे गारवा निर्माण झाला; मात्र आगामी पंधरा दिवस तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पंधरा दिवसात तापमान वाढणार असून, वातावरण दमट राहणार आहे. ७ एप्रिलनंतर पुन्हा अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसासोबतच विजांचा कडकडाट व वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे. वाढते तापमान व अवकाळी पावसामुळे फळबागा धोक्यात आल्या आहेत. अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात संत्रा व केळीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घेतल्या जाते. पावसामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. तापमानवाढीमुळेही फळबागांना धोका निर्माण झाला असून, झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.