गवळीपुऱ्यातील अवैध दारू अड्ड्यावर छापेमारी
By Admin | Updated: April 8, 2017 01:39 IST2017-04-08T01:39:44+5:302017-04-08T01:39:44+5:30
अकोला- गवळीपुरा येथील अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या दारू अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशावरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापेमारी केली.

गवळीपुऱ्यातील अवैध दारू अड्ड्यावर छापेमारी
उत्पादन शुल्क विभाग झोपेत
अकोला : रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गवळीपुरा येथील अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या दारू अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशावरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापेमारी केली. तब्बल दीड लाख रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य, सडवा मोहा, कॉस्टिक सोडा जप्त करून नष्ट करण्यात आला.
गवळीपुरा भागात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू अड्डे चालविण्यात येत असतानाही उत्पादन शुल्क विभाग मात्र त्यांच्यावर कारवाई करीत नाही. या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना मिळाल्यानंतर त्यांनी आदेश देऊन या परिसरात छापेमारी केली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार, सिटी कोतवालीचे अनिल जुमळे, खदानचे गजानन शेळके, जुने शहरचे रियाज शेख एमआयडीसीचे किशोर शेळके यांनी छापेमारी करीत तब्बल दीड लाख रुपयांच्या देशी दारूचा माल जप्त केला. या ठिकाणी अवैध देशी दारू बनविणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये इमाम हसन गौरवे, शेख इलियास शेख हसन, सुभान नौरंगाबादी, मुन्नीबाई हसन पळसोवाले, प्यारीबाई हसन हिरेवाले यांचा समावेश आहे, तर याच परिसरातून देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करणारे अनिल श्रीराम मेश्राम रा. तानखेड, स्वप्निल अशोक आवळे या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.