जुगार अड्ड्यावर धाड; पोलिस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: May 15, 2014 20:56 IST2014-05-15T20:56:36+5:302014-05-15T20:56:48+5:30
जुगार खेळत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक व्ही.पी. बुरुंगे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हे दाखल.

जुगार अड्ड्यावर धाड; पोलिस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हे दाखल
मूर्तिजापूर : येथील नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयानजीकच्या एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परीविक्षाधीन पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी धाड टाकून जुगार खेळत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक व्ही.पी. बुरुंगे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यावेळी तिघांना अटक करण्यात आली; परंतु बुरुंग फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, १४ मे च्या रात्री आठ वाजताचे दरम्यान जुनी वस्ती कोकणवाडी मार्गावरील नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयानजीकच्या राजू देशमुख यांच्या घरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक प्रवीण मुंढे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस कर्मचार्यांसह तेथे धाड टाकली. त्यावेळी तेथे मूर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक व्ही.पी. बुरुंगे व इतर तीन जण जुगार खेळत होते. धाड पडल्याचे समजताच बुरुंगे तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. इतर तीन जण मात्र पोलिसांच्या हाती पडले. पोलिसांनी बुरुंगे यांची मोटारसायकलसह आणखी एक मोटारसायकल व जुगाराच्या साहित्यासह ७५ हजार ४५ रुपयांचा ऐवज जप्त केला. राजू देशमुख (३१), वैभव इंगोले (२७) राजेंद्र कोठारी (२५) सर्व रा. मूर्तिजापूर व पीएसआय बुरुंगे यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४/५ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. मूर्तिजापूरच्या इतिहासात प्रथमच कायद्याचे रक्षक पोलिसच जुगार खेळताना आढळून आल्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे.