On the radar of the 'FDA' selling grocery at high rates | अधिक दराने किराणा विकणारे ‘एफडीए’च्या रडारवर

अधिक दराने किराणा विकणारे ‘एफडीए’च्या रडारवर

-  सचिन राऊत
अकोला: कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर शहरातील किराणा दुकानदारांनी याच संधीचा फायदा घेत गहू, तांदूळ तसेच डाळी व कडधान्याची अधिक दराने विक्री सुरू केली असून, अशा दुकानदारांच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाल्यानंतर अन्न विभागाने आता अशा दुकानदारांची तपासणी सुरू केली आहे. गोरक्षण रोडवरील त्रिगुणा तसेच कंचन या दोन दुकानांची तपासणी करून त्यांच्या दुकानातील गव्हाचे तसेच कडधान्याचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकान सुरू असून, त्यांनी संचारबंदीचा फायदा घेत काही वस्तूंची अधिक दराने विक्री सुरू केली आहे. यामध्ये गव्हाचा तुटवडा असल्याची अफवा करून ५० किलो गव्हाच्या पोत्यामागे तब्बल ५०० ते ७०० रुपये अधिक घेण्यात येत आहेत. गोरक्षण रोडवरील दोन दुकानांमध्ये अशाच प्रकारे जादा दराने विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही दुकानांची तपासणी करून गव्हासह कडधान्याचे नमुने घेऊन दुकानांवर कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे. यासह आता शहरातील किराणा दुकाने अन्न प्रशासनाच्या रडारवर असून, त्यांनी जिल्ह्यातील किराणा दुकानांची तपासणी सुरू केली आहे. या काळात काळाबाजार करणारे तसेच अधिक दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध विभागाने स्पष्ट केले आहे.
 
अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई
मनपाचे उपायुक्त वैभव आवारे व त्यांच्या पथकाने गोरक्षण रोडवरील किराणा दुकानांची तपासणी केल्यानंतर यापुढे असा प्रकार आढळल्यास दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यासह शहरात कुणीही अशा प्रकारे अधिक दराने विक्री करताना किंवा काळाबाजार करीत असल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
 
शहरासह जिल्ह्यात कोणत्याही दुकानामध्ये अशा प्रकारे गैरव्यवहार तसेच अधिक दराने विक्री सुरू असल्यास त्याची माहिती अन्न प्रशासनाला देण्यात यावी, अशा दुकानांवर निश्चितच कठोर कारवाई करून दुकानातील वस्तूंचे नमुने घेऊन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल.
- रावसाहेब वाकडे,
अन्न निरीक्षक, एफडीए, अकोला.

 

Web Title: On the radar of the 'FDA' selling grocery at high rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.