पाचशे रुपयांसाठी महिलांच्या ‘सीएससी’मध्ये रांगा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:04 IST2020-04-12T17:04:08+5:302020-04-12T17:04:24+5:30

‘सोशल डिस्टन्सिंग’कडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने कोरोना पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

Queue of women's 'CSC' for five hundred rupees; | पाचशे रुपयांसाठी महिलांच्या ‘सीएससी’मध्ये रांगा;

पाचशे रुपयांसाठी महिलांच्या ‘सीएससी’मध्ये रांगा;

अकोला : जन-धन खात्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून १ लाख ७० हजार महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ती रक्कम बँकेतून किंवा (सीएससी) ग्राहक सेवा केंद्रातून काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या सकाळपासूनच रांगा लागत असल्याचे चित्र बँक, ‘सीएससी’समोर दैनंदिन पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’कडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने कोरोना पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे देशातील कोट्यवधी मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून महिलांना ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला. योजनेतून जन-धन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत दरमहा ५०० रुपये जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यात महिलांची जन-धन योजनेची एकूण २ लाख ३५ हजार खाती आहेत. त्यापैकी १ लाख ७० हजार महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात ५०० रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम काढण्यासाठी संबंधित खातेधारकांना थेट बँक किंवा ग्राहक सेवा केंद्रात धाव घ्यावी लागते. त्यातच बँकेतून ही रक्कम मिळते की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला बँक सेवा देणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रातूनच रक्कम काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यातच आता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच व्यवहारांची वेळ सकाळी ८ ते १२ वाजतापर्यंत केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना सकाळीच घरातून निघावे लागते. काही महिला तर पायी चालत येऊन रांगेत उभ्या राहत असल्याचे चित्रही डाबकी रोडवरील ग्राहक सेवा केंद्रासमोर पाहायला मिळते.
या महिलांना रक्कम काढण्यासाठी थेट बँक किंवा सीएससी केंद्रातच यावे लागते. त्यांना ‘एटीएम’ची सुविधा नाही. बँकेतून चिठ्ठीद्वारे रक्कम देताना किमान रक्कम जमा ठेवण्याची अट टाकली जाते. त्यामुळे या कटकटीत न पडता सर्वच रक्कम ‘सीएससी’मधून एकाच वेळी काढण्याचा पर्याय महिलांकडून वापरला जात आहे. परिणामी, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.

Web Title: Queue of women's 'CSC' for five hundred rupees;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.