वैरणाचा प्रश्न, गव्हांड्याचे भाव भिडले गगनाला
By Admin | Updated: April 20, 2015 01:51 IST2015-04-20T01:51:42+5:302015-04-20T01:51:42+5:30
सध्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अन्य पिकांचे कुटार नसल्याने गव्हांड्याच्या मागणीत वाढ झाली आहे़

वैरणाचा प्रश्न, गव्हांड्याचे भाव भिडले गगनाला
सेवाग्राम : सध्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अन्य पिकांचे कुटार नसल्याने गव्हांड्याच्या मागणीत वाढ झाली आहे़ यामुळे गव्हांड्याचे भाव गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे़
जनावरांना पावसाळ्यापर्यंत पुरेल इतक्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी करतात़ यात कडबा, तूर, चणा, सोयाबीन आदींचे कुटार व थोड्या प्रमाणात गव्हांड्याचा समावेश असतो़ ग्रामीण भागात गव्हाचा पेरा राहत असल्याने सामान्यपणे गव्हांड्याला मागणी तशी नसते़ अनेक शेतकरी शेतातच गव्हाड्यांचे ढिग जाळून टाकतात़ ओळखीचे असल्यास मोफत दिले जात होते; पण गत दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी साडला आहे़ यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला़ कुणी विचारत नसलेल्या गव्हांड्याला दोन ते चार हजार रुपये गोणा, असा भाव आज मिळत आहे़ यामुळे गव्हांड्याची मागणी वाढली असल्याचे ग्रामीण भागात दिसून येते़
विदर्भात जनावरांचा चारा गव्हांडा नव्हे तर कडबा, चना व तुरीचे कुटार होते़ दुधाळू जनावरांसाठी हिरवा चारा, मुख्य चारा कडबा आता शेतातूनच हद्दपार झाला आहे़ यामुळे गाई चारायाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ यांत्रिकीकरण वाढल्याने चाऱ्याचे संकट अधिक गडद झाले़ शिवाय सोयाबीन पेरणीमुळेही चारा संकट गंभीर झाले़ शेतकऱ्यांकडे आता चाराच नसल्याने गव्हांड्याशिवाय पर्याय नाही. जनावरांशिवाय शेती नसल्याने शेतकऱ्यांना अधिक रक्कम मोजून गव्हांडा खरेदी करावा लागत असल्याचे दिसते़(वार्ताहर)