सॅनिटायझर खरेदीवर जि.प. सदस्यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 09:57 AM2020-07-14T09:57:05+5:302020-07-14T09:57:18+5:30

सॅनिटायझर व मास्क खरेदी प्रक्रियेवर सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Question marks on purchase of sanitizer by ZP members! | सॅनिटायझर खरेदीवर जि.प. सदस्यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

सॅनिटायझर खरेदीवर जि.प. सदस्यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत खरेदी करण्यात आलेल्या सॅनिटायझर व मास्क खरेदी प्रक्रियेवर सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग करण्यासाठी ‘आयसो प्रोफिल अल्कोअल्कोहोल अल्कोहोल सॅनिटायझर’ खरेदी करण्यात आल्याची माहिती गत १५ जून रोजी आरोग्य समितीच्या सभेत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत देण्यात आली होती; मात्र आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आलेले सॅनिटायझर आयसो प्रोफिल अल्कोहोल दर्जाचे नसल्याचा आरोप समितीच्या सदस्य अर्चना राऊत यांनी सभेत केला. तसेच आरोग्य समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता, आरोग्य विभागामार्फत सॅनिटायझर व मास्कची खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. ट्रिपल लेयर फिल्टर मास्कची प्रत्येकी १० रुपये किंमत असताना, आरोग्य विभागामार्फत १४ रुपये ९५ पैसे दराने मास्कची खरेदी कशी करण्यात आली, याबाबत सदस्य अर्चना राऊत यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा करीत, धारेवर धरले. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी दिलेल्या माहितीवर सदस्यांचे समाधान होऊ शकले नाही. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत मास्क व सॅनिटायझर खरेदीवर करण्यात आलेला खर्च नामंजूर असल्याचेही सदस्य अर्चना राऊत यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वच्छता राखण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी सभेत केली. तसेच जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या पुढील सभेत सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात यावे, असे निर्देशही सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, डॉ. गणेश बोबडे, गोपाल भटकर, अर्चना राऊत, प्रगती दांदळे, वसंतराव नागे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले उपस्थित होते.


‘सॅनिटायझर’ नावाखाली स्पिरिटचे वितरण!
 जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सॅनिटायझरच्या नावाखाली स्पिरिट वितरित करण्यात आले, असा आरोप समितीच्या सदस्य अर्चना राऊत यांनी सभेत केला.

Web Title: Question marks on purchase of sanitizer by ZP members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.