पूर्णा नदीत पुन्हा हिरवं पाणी!
By Admin | Updated: November 17, 2014 01:32 IST2014-11-17T01:32:49+5:302014-11-17T01:32:49+5:30
म्हैसांगसह सात ते आठ गावात दूषित आणि रसायनयुक्त पाणी, साथरोगाच्या उद्रेकाची भीती.

पूर्णा नदीत पुन्हा हिरवं पाणी!
अकोला- अमरावतीच्या उद्योगांमधील हिरवे आणि रसायनयुक्त घाण पाणी पुन्हा नदीपात्रात सोडण्यात आल्याने रविवारी म्हैसांग परिसरात पूर्णा नदीच्या पात्रात घातक आणि दूषित पाणी वाहून आले. म्हैसांगसह सात ते आठ गावांमध्ये याच पाण्याचा पुरवठा झाल्याने या गावांमध्ये जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी पूर्णा नदीला दूषित पाणी येत असल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा अमरावती येथील उद्योगांमधील घाण पाणी पूर्णा नदीत सोडण्यात येत असल्याने हे हिरवे आणि घातक पाणी म्हैसांग परिसरात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ अमरावती येथील उद्योगांमधील हिरवे आणि रसायनयुक्त घाण आणि दूषित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून, हेच पाणी पुढे पूर्णा नदीच्या पात्रात येत आहे. या नदीतील पाण्याचा पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी उपयोग म्हैसांग, दोनवाडा, एकलारा, पारद, सांगवामेळ, घुंगशी-मुंगशी, कट्यार, वडद, कपिलेश्वर, काटी-पाटी, केळीवेळी, गांधीग्रामसह आठ ते दहा गावांमध्ये करण्यात येतो. रविवारी पूर्णा नदीच्या पात्रात पुन्हा रसायनयुक्त हिरवे पाणी आल्याने म्हैसांगसह बहुतांश गावात या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.