आता रेतीमाफियांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर होणार दंडात्मक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST2021-05-10T04:18:21+5:302021-05-10T04:18:21+5:30
आजपर्यंत तालुक्यात पोलीस व महसूल विभागाने रेतीमाफियांवर अनेक कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पोलीस चोरीचा गुन्हा दाखल करीत ...

आता रेतीमाफियांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर होणार दंडात्मक कारवाई!
आजपर्यंत तालुक्यात पोलीस व महसूल विभागाने रेतीमाफियांवर अनेक कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पोलीस चोरीचा गुन्हा दाखल करीत असत किंवा महसूल विभागाला पत्र देऊन चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी कळवत असत. यामध्ये रेतीमाफिया हे पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी गळ घालत असत. कारण, १ लाख १५ हजार दंड भरण्यापेक्षा गुन्हा दाखल झाला तर वाहन तत्काळ सुटत असे. नंतर न्यायालयात पुराव्याअभावी खटला टिकत नसल्याने, गुन्हा दाखल करून वाहन सोडा, यासाठी रेतीमाफिया प्रयत्न करीत असत. आता मात्र, पोलीस व महसूल विभागाचे पथक तयार झाले असल्याने कोणीही कारवाई केली तरी, ती कारवाई संयुक्त समजली. त्यामुळे गुन्हा दाखल केल्यानंतरही दंडात्मक कारवाई आता होणारच आहे.
पोलिसांनी रेतीचे, अवैध गौण खनिजाचे वाहन पकडल्यानंतर महसूल विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित रेतीमाफियांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
-डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार
दोघा रेतीमाफियांना दंड
हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दोन वाहनांवर पोलिसांनी रेतीचोरीचा गुन्हा दाखल केला. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी रेतीमाफियांना प्रत्येकी १ लाख १५ हजार दंड याप्रमाणे २ लाख ३० हजार रुपये दंड ठोठावला आणि दंड वसूल झाल्यानंतरच वाहन सोडण्याचे पत्र हिवरखेड ठाणेदारांना दिले आहे.