मूर्तिजापुरात मास्क न घालणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:14 IST2021-02-17T19:14:47+5:302021-02-17T19:14:54+5:30
Murtijapur News २५१ जणांवर बुधवारी दंडात्मक कारवाई करुन ५० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मूर्तिजापुरात मास्क न घालणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई
मूर्तिजापूर : तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होऊन रोज रुग्णाची संख्या वाढत आहे. हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपविभागीय आधिकारी अभयसिंह मोहिते व नगरपरिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी स्वतः रस्त्यावर येत महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाच्या समन्वयक सहभागातून २५१ जणांवर बुधवारी दंडात्मक कारवाई करुन ५० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. .
कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून कोरोना योद्धेच कोरोनाची शिकार ठरत असल्याने पुनश्च कोरोना संकट गडद होत असल्याचे चिन्हे आहेत, या संकटावर मात करायची असेल, तर नागरिकांनी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन, मास्कचा वापर व गृह विलगीकरणावर गांभीर्याने अंमल करण्याची गरज निर्माण झाली आहे. मास्क न वापरणारांविरुध्द प्रशासनाने आपली मोहिम अधिक तिव्र करीत परीणामी २५१ नागरीकांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले. नागरीकांबरोबच प्रशासनाची जबाबदारी प्रचंड वाढली आहे, ही जबाबदारी विचारात घेऊन मास्क न वापरणारे, फिजिकल डिस्टंसिंग न राखणारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम बुधवार पासून तिव्र करण्यात आली.
तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रकोपाचे गांभीर्य विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करुन मास्क न बांधणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी २९ व बुधवारी १५ अशा ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. १७ जणांवर सध्या येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही नगरसेवकही कोरोना पॉझीटीव्ह आल्यामुळे धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व पालिका प्रशासन कडक मोहीम राबवित आहे. नियमाचा भंग करुन तोंडावर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनात व उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी विजय लोहकरेव ठाणेदार सचिन यादव यांच्या नियोजनात आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्यासाठी गठित पथकांपैकी मंडळ अधिकारी महेश नागोलकर, सदानंद देशपांडे, राजेंद्र जाधव, सुनिल डाबेराव, अनिल बेलाडकर, रामराव जाधव, सोनोने, आरोग्यशानिरिक्षक विजय लकडे यांच्या नेतृत्वातील पथकांनी मास्क न घालणाऱ्या २५१ लोकांकडून ५० हजार २०० रुपये दंड वसूल केला.