अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या!
By Admin | Updated: August 29, 2015 00:24 IST2015-08-29T00:24:22+5:302015-08-29T00:24:22+5:30
अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव मंजूर.

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या!
अकोला: अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात जमीन खरवडून गेली. तसेच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील अतवृष्टीग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.
गत ४ व ५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात अतवृष्टी झाली. अतवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतजमीनही खरवडून गेली. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी, पिकांचे नुकसान आणि खरवडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईची मदत शासनाकडून तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी सभागृहात केली. त्यानुषंगाने यासंबंधीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बाश्रीटाकळी तालुक्यात सिंचन विहिरींसाठी शेतकर्यांकडून आलेले अर्ज व मंजूर अर्जासंबंधी पांडे गुरुजी यांनी विचारणा केली असता, सिंचन विहिरींसाठी शेतकर्यांकडून प्राप्त ८१0 अर्ज गत चार महिन्यांपासून अद्याप मंजुरीअभावी प्रलंबित असल्याची माहिती सभेत देण्यात आली. यासंदर्भात बाश्रीटाकळी पंचायत समिती गटविकास अधिकार्यांकडून मागविण्यात आलेला अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही सभेत सांगण्यात आले. स्थायी समितीच्या सभेला सभेला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी उपस्थित राहण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे सभेत ठरविण्यात आले. किमान तीन दिवसआधी सदस्यांना सभेची नोटीस मिळाली पाहिजे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली. महाजल योजनेंतर्गत वाडेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले; मात्र जलवाहिनीद्वारे पाणी पोहोचत नसल्याचा मुद्दा सदस्य डॉ.हिंमत घाटोळ यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्ष शरद गवई यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांना दिले. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि उपलब्ध रोपे, कर वसुली, जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली कामे व इतर विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सभापती गोदावरी जाधव, सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ.हिंमत घाटोळ, पुंडलिक अरबट, रामदास लांडे, गजानन उंबरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनमादार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.