महापालिकेत बुधवार ठरला आंदोलनाचा
By Admin | Updated: December 11, 2014 00:51 IST2014-12-11T00:51:27+5:302014-12-11T00:51:27+5:30
कर्मचा-यांचे काळ्य़ा फिती लावून आंदोलन; आठ महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मनपात शिक्षकांची गांधीगिरी.

महापालिकेत बुधवार ठरला आंदोलनाचा
अकोला: महापालिका कर्मचार्यांचे नियमित वेतन आणि पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम थकीत आहे. हे वेतन देण्यात यावे या मागणीसाठी कर्मचारी संघर्ष समितीने ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडले असून, बुधवारी कर्मचार्यांनी काळ्य़ा फिती लावून कामकाज केले.
महापालिकेच्या सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्यांचे पाच महिन्याचे वेतन थकीत आहे. कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करून फरकाची रक्कम अदा करणे, जुलैपासून वेतनवाढ लागू करणे, रजा रोखीकरण, उपदानाची रक्कम सेवानवृत्त कर्मचार्यांना मुदतीच्या आत वाटप करण्यासोबतच पगारातून कपात केलेली रक्कम कर्मचार्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करण्याच्या मागणीसाठी मनपा कर्मचारी संघर्ष समितीने ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडले. टप्प्याटप्प्याने छेडल्या जाणार्या आंदोलनादरम्यान ८ डिसेंबर रोजी मनपासमोर ताटवाटी बजाओ आंदोलन करण्यात आले होते. दुसर्या टप्प्यात १0 डिसेंबर रोजी मनपा कर्मचार्यांनी काळ्य़ा फिती लावून आंदोलन छेडले असून, सदर आंदोलन १२ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतरही प्रशासनाने कर्मचार्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास २३ डिसेंबरपासून मनपा कार्यालयावर मोर्चा व बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी. भातकुले यांनी स्पष्ट केले.
त्याच प्रमाणे महापालिका प्रशासनाने आठ महिन्यांपासून वेतन अदा न केल्याने संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. बुधवारी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी गांधीगिरी करीत मनपा अधिकार्यांना गुलाबाचे फूल देऊन भावना व्यक्त केल्या.