प्रस्तावित विकासकामे २ कोटींची, मिळाले १ कोटी २0 लाख
By Admin | Updated: December 10, 2014 01:58 IST2014-12-10T01:58:44+5:302014-12-10T01:58:44+5:30
लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या कामांना लागणार कात्री.

प्रस्तावित विकासकामे २ कोटींची, मिळाले १ कोटी २0 लाख
अकोला - ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांसाठी २0१४-१५ या वर्षाकरिता लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या २ कोटींच्या कामांसाठी शासनाकडून १ कोटी २0 लाख रुपयेच निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागासाठी प्रस्तावित केलेल्या विकासकामांना कात्री लावण्याची वेळ जिल्हा परिषद बांधकाम विभागावर आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १ ऑगस्ट २0१४ रोजी अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या २३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. या प्रस्तावित कामांसाठी शासनाकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला २ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने बांधकाम विभागातर्फे कामांचे नियोजन करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आणि कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, पंचायत विभागातर्फे यातील ६0 लाख रुपयांच्या कामांचे परस्पर आदेशही ग्रामपंचायतींना देण्यात आले असल्याची माहिती आहे. या कामांसह बांधकाम विभागाने तब्बल १ कोटी ६0 लाख रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश २७ नोव्हेंबरपूर्वीच काढले आहेत. त्यामुळे १ कोटी ६0 लाख रुपयांचा निधी बांधकाम विभागाला मिळणे अपेक्षित असताना २७ नोव्हेंबर रोजी बांधकाम विभागाला बीडीएसवर लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांसाठी १ कोटी २0 लाख रुपयांचा निधीच मिळाला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या तब्बल ८0 लाख रुपयांच्या कामांना कात्री लावण्याची वेळ जिल्हा परिषद बांधकाम विभागावर आली आहे. यात सर्वात मोठे काम ४0 लाख रुपये निधीतून प्रस्तावित असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे आहे. विशेष म्हणजे, हे काम जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदारांनीच सुचविले आहे. याशिवाय अकोला पूर्व मतदारसंघात तत्कालीन आमदारांनी सूचविलेल्या कामांपैकी ३0 लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामालाही कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. हे कामही जिल्हा परिषदेतील सत्तेत असलेल्या पक्षाच्या तत्कालीन आमदारांनी सुचविले होते.