विकासकामांसाठी जागा मागणीचे प्रस्ताव मार्गी लावा!
By Admin | Updated: November 13, 2014 01:11 IST2014-11-13T01:11:59+5:302014-11-13T01:11:59+5:30
अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश : महसूल अधिका-यांची आढावा बैठक.

विकासकामांसाठी जागा मागणीचे प्रस्ताव मार्गी लावा!
अकोला : सिंचन प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली जमीन आणि विकासकामांसाठी लागणार्या जागांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी जिल्ह्यातील महसूल अधिकार्यांच्या आढावा बैठकीत दिले.
विविध सिंचन प्रकल्प, शासकीय कार्यालयांच्या इमारतीसाठी लागणारी जागा तसेच विविध विकासकामांसाठी आवश्यक असणारी जमीन किंवा जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गौण खनिज, जमीन महसूल, करमणूक कर आदी महसूल वसुलीसंदर्भात देण्यात आलेले उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून, ई-प्रणाली अंतर्गत ह्यसात-बाराह्णचे संगणकीकरण, ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वाटप, सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत वितरित करण्यात येणारे दाखले व इतर बाबींचा आढावा जिल्हाधिकारी शिंदे यांनी यावेळी घेतला. आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, एम. डी. शेगावकर, प्रमोदसिंह दुबे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.