घटनास्थळावर आढळले जाळल्याचे पुरावे
By Admin | Updated: May 30, 2017 02:05 IST2017-05-30T02:05:52+5:302017-05-30T02:05:52+5:30
सख्ख्या मावसभावांनी बहिणीचा खून केल्याचे प्रकरण; गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त

घटनास्थळावर आढळले जाळल्याचे पुरावे
लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ: अब्रू जाण्याच्या भीतीने सख्ख्या मावसभावांनी बहिणीची गळा दाबून हत्या केल्याची घटना २८ मे रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी उरळ पोलिसांनी २९ मे रोजी आरोपींना पे्रत जाळलेल्या भेंडवळच्या जंगलातील स्थळावर नेले. तेथे प्रेत जाळल्याचे पुरावे मिळाले असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
मोखा गावात मागील दहा वर्षांपासून भिकाबाई हिचा मावसभाऊ हरिभाऊ गुलाबराव घेंगे व बाळकृष्ण गुलाबराव घेंगे यांनी ७ मार्च २०१७ रोजी राहत्या घरात गळा आवळून खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच रात्री तिचे प्रेत भेंडवळच्या जंगलात जाळले. त्यानंतर १३ मे २०१७ रोजी उरळ पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी मावसबहीण भिकाबाई दोन महिन्यांपासून हरविली असल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचा विजय चव्हाण यांनी तपास करून आरोपींना गजाआड केले होते.
दोन्ही आरोपींनी अब्रू जाण्याच्या भीतीतून खून केल्याची कबुली दिली होती. तसेच प्रेत भेंडवळच्या जंगलात जाळल्याचे सांगितले होते. उरळ पोलिसांनी सोमवारी भेंडवळच्या जंगलात दोन्ही आरोपींना नेऊन स्पॉट पंचनामा केला.
तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय साठवणे, पोलीस नायक विजय चव्हाण, संजय कुंभार, डांगे व गावंडे हे करीत आहेत.