जातवैधता प्रमाणपत्राची फेरपडताळणी तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:56+5:302021-02-05T06:17:56+5:30
जातवैधता प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले होते. त्यानुसार, यादीमधील २७ अर्जदारांना पत्र देऊनही प्रतिसाद दिलेला नाही, ...

जातवैधता प्रमाणपत्राची फेरपडताळणी तातडीने करा
जातवैधता प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले होते. त्यानुसार, यादीमधील २७ अर्जदारांना पत्र देऊनही प्रतिसाद दिलेला नाही, अशा उमेदवारांनी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला यांच्याकडे मूळ जातवैधता प्रमाणपत्रांसह इतर जातीविषयक आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता एक संच छायांकित प्रतीसह आठ दिवसांच्या आत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याबाबत अर्जदारांची नावे पडताळणी कार्यालयात लावण्यात आली आहेत. अर्जदारांनी मुदतीत पूर्तता न केल्यास संबंधित अर्जदारांचे प्रकरण गुणवत्ता खुली ठेवून नस्तीबद्ध करण्यात येईल तसेच जातवैधता प्रमाणपत्रांचा वापर भविष्यात करता येणार नाही. तसे केल्यास मागासवर्ग व विशेष प्रवर्ग अधिनियमानुसार कार्यवाहीसह शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राहुटी अभियान यशस्वी करा; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
अकोला, (जिमाका)- जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेच्या अडीअडचणी निवारण करण्याकरिता पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाव्दारे डिजिटल राहुटी अभियान राबविण्यात येणार आहे. राहुटी अभियान यशस्वी होण्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी पार पाडण्याकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समिती गठीत केली आहे.
जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक मीरा पागोरे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याकडे जिल्ह्यांच्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या डिजिटल राहुटी अभियानाचे नियोजन करणे व डिजिटल राहुटी अभियान १०० टक्के यशस्वी करण्याकरिता आवश्यक ती कामे करणे, ही जबाबदारी देण्यात आली आहे. तांत्रिक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले यांनी डिजिटल राहुटी अभियान यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी लागणारे तांत्रिक बळ, त्याचप्रमाणे जेथे-जेथे डिजिटल राहुटी कार्यक्रम राबविण्यात येत आहे, तेथे उपस्थित राहून तांत्रिक अडचण जाणार नाही. त्याबाबत संपूर्ण नियोजन करणे तसेच सहायक तांत्रिक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमोदसिंह ठाकूर, विशाल धोटे व निलेश सवडतकर यांनी तांत्रिक अधिकारी यांच्या संपर्कात राहून डिजिटल राहुुटी अभियानास तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण होणार नाही, त्याबाबत आवश्यक सर्व जबाबदारी पार पाडावी. उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या उपविभागात राबविण्यात येणाऱ्या डिजिटल राहुटी अभियानाचे नियोजन करणे व डिजिटल राहुटी अभियान १०० टक्के यशस्वी होईल, याकरिता आवश्यक त्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले आहे.