दलालांचा दुकाने बंद ठेवून निषेध
By Admin | Updated: January 21, 2015 01:06 IST2015-01-21T01:06:30+5:302015-01-21T01:06:30+5:30
दलालमुक्त आरटीओ कार्यालयाच्या आदेशाने खळबळ.

दलालांचा दुकाने बंद ठेवून निषेध
अकोला : 'दलालमुक्त आरटीओ' करण्याचा आदेश राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दिल्याने आरटीओ कार्यालय परिसरातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी कार्यालय परिसरात येण्यास दलालांना मनाई करण्यात आल्याने परिसरातील दलाल, मोटारवाहन प्रशिक्षण संस्थाचालकांनी त्यांची दुकाने बंद ठेवून आयुक्तांचा निषेध केला. दलालांच्या आंदोलनामुळे नागरिकांना थोडाबहुत त्रास सहन करावा लागला.
राज्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) दलालमुक्त करण्याचे राज्य परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार १२ जानेवारी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात तेथे दुकाने मांडलेल्या दलालांना काम करण्यास प्रतिबंध घालण्याचे म्हटले आहे. आरटीओच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामकाजाची माहिती घेण्यासाठी १९ जानेवारीपासून आरटीओ कार्यालयांना अचानक भेटी देऊन निरीक्षण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय परिसरातील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.
रोजगार हिरावला जाण्याची भीती दलालांमध्ये निर्माण झाल्याने परिसरातील जवळपास १२५ दलाल व मोटारवाहन प्रशिक्षण संस्थाचालकांनी मंगळवारी सकाळी ११ पासून काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये परिसरातील झेरॉक्स दुकानदार, इंटरनेट कॅफेचालकसुद्धा सहभागी झाले.
दलालांनी राज्य परिवहन आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध केला आणि आरटीओ कार्यालयामध्ये निदर्शने केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आरटीओ कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नागरिकांना परवाना अर्ज न घेताच तेथून परतावे लागले.