सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास बंदी
By Admin | Updated: November 19, 2014 02:01 IST2014-11-19T02:01:46+5:302014-11-19T02:01:46+5:30
विषारी वायूचे मानवी जीवनावर घातक परिणाम.

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास बंदी
सचिन राऊत / अकोला
अशास्त्रीय पद्धतीने मोकळ्या जागेत टायर जाळल्याने मोठय़ा प्रमाणात विषारी वायूची निर्मिती होते. त्याचे घातक परिणाम मनुष्यासह पर्यावरणावरही होत असून, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल दिल्यानंतर, अशाप्रकारे टायर जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मोकळया जागेत टायर जाळल्याने मोठय़ा प्रमाणावर विषारी वायू वातावरणात पसरतात. याचे मानवी आरोग्यावर प्रचंड घातक परिणाम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य सरकारला सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती अधिसूचना जारी करण्याची शिफारस केली होती. यावरून मुंबई पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात टायर जाळण्यास बंदी घालण्यासाठी योग्य कारवाई करता यावी, यासाठी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार वायुप्रदूषण क्षेत्रामध्ये टायर जाळण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे.
तद्वतच, पुणे खंडपीठाच्या हरित लवादानेही ९ सप्टेंबर रोजी गृह, तसेच महसूल विभागाला आदेश देऊन सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापृष्ठभूमिवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीव मित्तल यांनी दिला आहे.