अकोला जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन वाढले; क्षेत्र घटले !
By Admin | Updated: November 16, 2014 00:55 IST2014-11-16T00:55:07+5:302014-11-16T00:55:07+5:30
यंदा एकरी १५ ते २0 क्विंटलचा उतारा

अकोला जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन वाढले; क्षेत्र घटले !
अकोला : यंदा ज्वारीचे उत्पादन वाढले असून, एकरी १५ ते २0 क्विंटलपर्यंतचा उतारा लागला आहे. तथापि, क्षेत्र कमी असल्याने जादा उतार्याचा लाभ जिल्ह्यातील मोजक्या शेतकर्यांना झाला आहे. ज्वारी हे पश्चिम विदर्भातील प्रमुख पीक आहे. अलीकडच्या काही वर्षांत या पिकांची पेरणी घटली असून, सोयाबीन पिकाने त्याची ही जागा घेतली आहे. २0१३-१४ मध्ये ज्वारीखालील क्षेत्र २३,५९९ हेक्टर होते, ते २0१४-१५ च्या खरीप हंगामात १२,४७६ हेक्टर राहिले आहे. क्षेत्र घटण्यामागे मिळणारा अत्यल्प बाजारभाव हे प्रमुख कारण असले तरी वन्यजिवांचा सर्वाधिक फटका या पिकाला बसत असल्याने शेतकर्यांनी ज्वारी पेरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ज्वारीची भाकरीदेखील दुर्मीळ होत चालली आहे. दस्तुर खुद्द शेतकर्यांच्या घरीच भाकरी-ठेच्याचा मेवा दुर्लभ झाला आहे. यावर्षी शेतकर्यांनी किमान गुरांना चारा होईल, या बेतानेच ज्वारीची पेरणी केली. मोजकाच झालेला पाऊस या पिकाला मानवल्याने यावर्षी उत्पादन हे एकरी १५ ते २0 क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. ज्वारी पांढरी शुभ्र आहे. आता या शेतकर्यांना शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.