उत्पादन घटले, बाजार समित्या ओस!
By Admin | Updated: October 28, 2014 01:01 IST2014-10-28T01:01:14+5:302014-10-28T01:01:14+5:30
शेतमाल उत्पादनात प्रचंड घट; आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटल सोयाबीनची आवक.

उत्पादन घटले, बाजार समित्या ओस!
विवेक चांदूरकर / अकोला
यावर्षी निसर्ग शेतकर्यांवर कोपला असून, पावसाने दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणार्या उलाढालीवर झाला आहे. आडातच नाही, तर पोहर्यात कोठून येणार?, या उक्तीप्रमाणे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालांची आवक नगण्य आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत पावणे दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, यावर्षी आतापर्यंत केवळ २0 हजार क्विंटलची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अवघी १0 टक्के आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला दोन महिने पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांनी मूग व उडिदाची अल्प क्षेत्रात पेरणी केली. त्यांची आशा सोयाबीनवर व पुढील पावसावर टिकून होती; मात्र संपूर्ण पावसाळ्या तच पाऊस कमी झाला, परतीचाही पाऊस बरसला नाही. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले, दाणाही बारीक राहिला. यावर्षी एकरी सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन झाले. काही शे तकर्यांना तर एकरी अवघे ४0 ते ५0 किलो उत्पादन झाले आहे. अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीला आणले. २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ २0 हजार क्विंटलचीच समितीत आवक झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही आवक पावणे दोन लाख क्विंटल होती. गत सहा दिवस म्हणजे २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान बाजार समिती बंद असतानाही सोमवारी केवळ पाच हजार क्विंटल सोयाबीन शेतकर्यांनी समितीत आणले.
दररोज सरासरी दोन ते तीन हजार क्विंटलच आवक होत आहे. गतवर्षी याच मोसमात दरदिवशी १५ ते २0 हजार क्विंटल होत होती. यावर्षी सोयाबीनला २७00 ते ३१00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.