सात जुगाऱ्यांना कारावासाची शिक्षा

By Admin | Updated: June 14, 2017 02:15 IST2017-06-14T02:15:30+5:302017-06-14T02:15:30+5:30

पोलिसांनी पकडलेल्या एका जुगारावरील सात जुगाऱ्यांना प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Prison for seven gamblers | सात जुगाऱ्यांना कारावासाची शिक्षा

सात जुगाऱ्यांना कारावासाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुगाऱ्यांचा डाव रंगतो, पोलीस कारवाई करतात आणि त्यानंतर पोलीस ठाण्यातून या जुगाऱ्यांना सोडून देण्यात येते. या प्रकारचे अनेक जुगार अड्डे आणि जुगारी आहेत; मात्र पोलिसांनी पकडलेल्या एका जुगारावरील सात जुगाऱ्यांना प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच प्रत्येकी ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील यशवंत नगर, वाशिम बायपासजवळ जुगार अड्डा सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे यांनी ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी छापा टाकला होता. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून भारत सहदेव गोपनारायण, यशवंत भीमराव कांबळे, सुमित सुखदेव कांबळे, गौतम सहदेव कांबळे, समाधान गोमाजी सिरसाट, सुभाष नारायण पळसपगार सर्व राहणार यशवंत नगर, अब्दुल सलीम अब्दुल शमीम (रा. इराणी झोपडपट्टी) यांना अटक केली होती. त्यांच्याजवळून ५२ ताशपत्ते, १३ हजार ८५० रुपये रोख आणि चार मोबाइल असा ऐवज जप्त केला होता. सदर सात जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करून प्रकरण प्रथमश्रेणी न्यायालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर सहावे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्वेता चांडक यांच्या न्यायालयाने सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासले, त्यानंतर समोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सातही जुगाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी दहा दिवसांची शिक्षा सुनावली, तसेच ३०० रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कैदेचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. जी.एल. इंगोले यांनी काम पाहिले.

Web Title: Prison for seven gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.