आनंद बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा
By Admin | Updated: January 25, 2016 02:15 IST2016-01-25T02:15:57+5:302016-01-25T02:15:57+5:30
जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर कारवाई;पाइन अँपल केक व सॅन्डवीच ब्रेडचे पाकीट जप्त.

आनंद बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा
अकोला: रामदासपेठ परिसरात असलेल्या आनंद बेकरीवर रविवारी रात्री अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापेमारी केली. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली असून, बेकरीमधून पाइन अँपल केक व सॅन्डवीच बेकरीचे पाकीट जप्त करण्यात आले आहेत. आनंद बेकरी येथून रविवारी एका इसमाने पाइन अँपल केक व सॅन्डवीच ब्रेडचे पाकीट खरेदी केले होते. त्यांनी या दोन्ही खाद्यपदार्थांंचे पाकीट घरी आणल्यानंतर त्याची निरखून तपासणी केली असता त्यावर मुदतबाहय़ होण्याचा कालावधी किंवा तारीख देण्यात आली नव्हती. त्यानंतर या इसमाने आनंद बेकरी संचालकाच्या हा प्रकार निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र आनंद बेकरी संचालकांनी हेकेखोरी करीत या ग्राहकास परत पाठविले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे केली. जिल्हाधिकार्यांनी तातडीने दखल घेत अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांना प्रकरणाची चौकशी करून आनंद बेकरीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाआयुक्त एस. एम. कोलते यांच्या आदेशावरून अन्न निरीक्षक रावसाहेब वाकडे व प्रशांत अजिंठेकर या दोन अधिकार्यांनी रविवारी सायंकाळी आनंद बेकरी गाठून तेथील सॅन्डवीच ब्रेड व पाइन अँपल केकचे नमुने घेतले. त्यानंतर ५१ सॅन्डवीच ब्रेड व ५ पाइन अँपल केकचे पाकीट जप्त केले. दोन्ही खाद्यपदार्थांंचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आनंद बेकरीवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.