ज्ञानेश्वरी कळण्यासाठी भाव आवश्यक
By Admin | Updated: January 6, 2015 01:32 IST2015-01-06T01:32:41+5:302015-01-06T01:32:41+5:30
आदिशक्ती मुक्ती मंडळाच्यावतीने ज्ञानेश्वरी प्रवचनमालेत सातारकर यांचे प्रतिपादन.

ज्ञानेश्वरी कळण्यासाठी भाव आवश्यक
अकोला: ज्ञानेश्वरीमध्ये जीवनाचा मथितार्थ मांडला आहे. जीवन परिपूर्तीसाठी कसे जगावे, हे ज्ञानेश्वरी सांगते. ज्ञानेश्वरी समजण्यास अनेकांना कठीण वाटते मात्र, ज्ञानेश्वरी कळण्यासाठी भाव आवश्यक आहे, असे मत बाबा महाराज सातारकर यांनी सोमवारी अकोल्यात व्यक्त केले. आदिशक्ती मुक्ताबाई मंडळाच्यावतीने कौलखेडमध्ये आयोजित ज्ञानेश्वरी निरुपण सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफताना बाबा महाराज सातारकर बोलत होते. आरंभी दिगांबर गावंडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व महाराजांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमहापौर विनोद मापारी, आशाताई गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, डॉ. नानासाहेब चौधरी, नाना उजवणे, नगरसेवक पंकज गावंडे, मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम पालखेडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना महाराजांनी आपण ज्ञानेश्वरी जीवनात अनुभवली असल्याचे सांगितले. प्रभू शोधण्यासाठी आपण जातो; परंतु जीवाच्या दर्शनातूनच प्रभूचे दर्शन होते. जीवनात प्रदर्शनाला महत्त्व नाही, श्रद्धा पाहिजे. ईश्वरी सत्ता श्रद्धेनेच प्राप्त होऊ शकते. आपले जीवन सुरळीत करायचे असेल तर साधुसंतांचा आशीर्वाद आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीदेखील हे शिकविते. ज्ञानेश्वरीतच वारकरी संप्रदायाचा विचार पहावयास मिळतो. प्रेम हा वारकरी संप्रदायाचा स्थायी भाव आहे आणि प्रेमातूनच वैराग्य निर्माण होऊ शकते, असे बाबा महाराजांनी सांगितले. याप्रसंगी मोठय़ा प्रमाणात भाविक उपस्थित होते.