सोयाबीनला ९ तर कपाशीला १२,५०० हजार रुपये भाव द्या- रविकांत तुपकर
By रवी दामोदर | Updated: October 27, 2023 18:33 IST2023-10-27T18:33:31+5:302023-10-27T18:33:57+5:30
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढणार ‘एल्गार रथयात्रा’

सोयाबीनला ९ तर कपाशीला १२,५०० हजार रुपये भाव द्या- रविकांत तुपकर
अकोला: यंदा पावसाचा प्रदीर्घ खंड व यलो मोझॅकमुळे खरीप हंगामात सोयाबीनच्या उताऱ्यात प्रचंड घट झाली आहे. त्यात बाजारात सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थिती सरकारने विना अट प्रति एक्कर १० हजार रुपयांची मदत करावी, तसेच सोयाबीन पिकाला ९ हजार, तर कपाशीला १२,५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहिर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दि.२७ ऑक्टोबर रोजी अकोल्यात आयोजित पत्रपरिषदेतून केली. तसेच कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, विविध मागण्यांसाठी दि.१ नोव्हेंबर रोजी शेगाव येथून ‘एल्गार रथयात्रा’ काढणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखविण्यासाठी ही ‘एल्गार रथयात्रा’ असून, दि. २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्या या रथयात्रेचा समारोप होणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असून, सरकार असंवेदनशिल झाले आहे. पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अतिवृष्टीची भरपाई तत्काळ द्या, रब्बी हंगामात सिंचनासाठी पूर्णवेळ वीज पुरवठा करा, शेतरस्ते, पाणंदरस्त्यांचे प्रश्न तत्काळ निकाली काढा, अशा विविध मागण्या तुपकर यांनी याप्रसंगी केल्या. पत्रपरिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनुप अढाऊ, चंद्रशेखर गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विदर्भातील नेते सभागृहात सोयाबीन, कपाशीबाबत बोलणे टाळतात
सध्या सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे पूर्णत: राज्यसरकारचे दुर्लक्ष होत आहे. विदर्भातील नेते सोयाबीन, कपाशीबाबत नेहमी सभागृहात बोलणे टाळतात. त्यामुळेच ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. आगामी दिवसात निवडणुका असून, नेत्यांचे दौरे सुरू होणार आहेत. त्यामुळे शेतकरी पुत्रांनी नेत्यांंच्या गाड्या अडवून सोयाबीन, कपाशीचा जाब विचारावा, असे आवाहन तुपकर यांनी याप्रसंगी केले.