पिंजर परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:17+5:302021-07-10T04:14:17+5:30
पिंजर परिसरात गत दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड ...

पिंजर परिसरात पावसाची हजेरी; पिकांना जीवनदान
पिंजर परिसरात गत दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत होता. पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. शेतात अंकुरलेली कोवळी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हतबल झाला होता. परिसरात गुरुवारी सायंकाळी, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. परिसरातील पिंजर, वडगाव, खेरडा, मोझरी, पारडी, दोनद, निंबी, भेंडगाव, हातोला, जनुना, निहिदा, बहिरखेड, लखमापूर, सावरखेड, पिऱ्हांडे, धाकली, पराभवानी, मोरहळ आदी गावांत दमदार पाऊस पडला.
-------------------
माळेगाव बाजार परिसरात दुबार पेरणीचे संकट
माळेगाव बाजार : माळेगाव बाजार परिसरात पावसाने दडी मारल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित सापडला असून, पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज प्रारंभी व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे बी-बियाणे खरेदी केले; मात्र एक महिना उलटला, तरी पाऊस बरसला नसल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत. काही पिके अंकुरली असून, सोयाबीन, कपाशी पिकांवर वाणीने हल्ला चढविला आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवसांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.