अकोला जिल्हय़ात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 6, 2016 02:44 IST2016-06-06T02:44:41+5:302016-06-06T02:44:41+5:30
वातावरणात गारवा : अनेक ठिकाणी झाडांची पडझड, घरांवरील पत्रे उडाली.

अकोला जिल्हय़ात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
अकोला: जून महिना सुरू झाल्यापासून वातावरणात बदल झाला असून, ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला आहे. रविवारी दुपारी वातावरणात अचानक बदल होऊन मान्सूनपूर्व पावसाने मूर्तिजापूर व बाश्रीटाकळी तालुका वगळता बाळापूर, आकोट, तेल्हारा, पातूर व अकोला तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी हजेरी लावली. वादळी वार्यासह आलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड, टिन उडणे यांसारख्या घटना वगळता मोठी हानी झाली नाही. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा आला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यापासून दिलासा मिळाला.गत महिनाभरापासून शहरासह संपूर्ण जिल्ह्याने उन्हाची दाहकता अनुभवली आहे. यावर्षी तापमापीतील पार्याने गत काही वर्षांचे विक्रम मोडीत काढले. मे महिन्याच्या उत्तरार्धात तर पारा ४७ अंशावर गेला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उन्हाची दाहकता कायम राहिली. गत दोन ते तीन दिवसांपासून मात्र रोहिणी नक्षत्रातील सरी बरसल्याने वातावरणात बदल होत आहे. रविवारी दुपारी अडीच ते ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बाळापूर तालुक्यातील हातरूण, निंबा फाटा, कवठा, तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा शहरालगतचा परिसर, पंचगव्हाण, आकोट तालुक्यातील आकोट शहर व लगतची गावे, पातूर तालुक्यात खेट्री, चतारी, चांगेफळ, बाभूळगाव, आलेगाव, अकोला तालुक्यातील गांधीग्राम, वल्लभनगर, उगवा, सुकोडा, गोपालखेड आदी गावांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. काही ठिकाणी वादळी वार्यांमुळे झाडांची पडझड झाली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे काही ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त आहे.