विधीमंडळ ‘रोहयो’ समितीच्या दौऱ्याची जिल्हा परिषदेत पूर्वतयारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST2021-09-27T04:20:50+5:302021-09-27T04:20:50+5:30
अकोला: राज्य विधीमंडळाची रोजगार हमी योजना (रोहयो) समिती ११ आॅक्टोबरपासून तीन दिवसांच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर येणार असून, जिल्हयातील ...

विधीमंडळ ‘रोहयो’ समितीच्या दौऱ्याची जिल्हा परिषदेत पूर्वतयारी !
अकोला: राज्य विधीमंडळाची रोजगार हमी योजना (रोहयो) समिती ११ आॅक्टोबरपासून तीन दिवसांच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर येणार असून, जिल्हयातील रोहयो कामांची तपासणी करणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.त्यामध्ये सोमवारी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची आणि मंगळवारी जिल्हयातील गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ)बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य विधीमंडळाची ‘रोहयो ’ समिती ११, १२ व १३ आॅक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. समितीप्रमुख आमदार मनोहर चंदिकापूरे यांच्यासह २५ आमदार आणि विधीमंडळाचे उपसचिव आणि अधिनस्त अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ‘रोहयो’ समिती २०१६ ते २०२१ या कालावधीत जिल्हयातील ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांची तपासणी करणार आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेली रोजगार हमी योजनेची कामे आणि त्यावर झालेला निधी खर्च यासंदर्भात रोहयो समिती माहिती घेणार असल्याने, यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. विधीमंडळ रोहयो समितीच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवार, २७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची आणि मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी जिल्हयातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) बैठक घेणार आहेत.