नवोदितांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात
By Admin | Updated: May 9, 2017 14:02 IST2017-05-09T14:02:01+5:302017-05-09T14:02:01+5:30
यवतमाळ येथील वणी येथे २४ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले असून, त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

नवोदितांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात
अकोला : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने येत्या २१ व २२ मे रोजी विदर्भात प्रथमच यवतमाळ येथील वणी येथे २४ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले असून, त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी अँड. पुरुषोत्तम खेडेकर, तर स्वागताध्यक्षपदी वखार महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार ठुबे राहणार आहेत.
तीन दशकापासून साहित्य परिषदेच्यावतीने अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, युवा मराठी साहित्य संमेलन, बालाघाट मराठी साहित्य संमेलन, पुणे येथे शिवजयंतीला होणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन, महात्मा फुलेंच्या जन्मगावी खानवडी पुणे येथे महात्मा फुले साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन केले आहे.
यापूर्वीची अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन अनेक ठिकाणी पार पडली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशासह देशभरात बारा हजाराहून अधिक सभासद असलेल्या साहित्य परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद आजवर प्रा.वसंत बापट, द.मा.मिरासदार, शिवाजी सावंत, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, विश्वास पाटील, प्रा.फ.मु. शिंदे, डॉ.गंगाधर पानतावणे, प्रा.इंद्रजित भालेराव, प्रा.विठ्ठल वाघ, माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव, डॉ.आ.ह.साळुंखे, लक्ष्मण माने, राजन खान यांच्यासह अनेक साहित्यिकांनी भूषवलेले आहे, अशी माहिती विभागीय अध्यक्ष विशालराजे बोरे, सरचिटणीस गोपाल नारे यांनी दिली. (प्रतिनिधी)