मतमोजणीची तयारी पूर्ण

By Admin | Updated: May 14, 2014 19:30 IST2014-05-14T19:16:19+5:302014-05-14T19:30:13+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या शुक्रवार,१६ मे रोजी होणार असून जिल्हा प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Preparation for counting is complete | मतमोजणीची तयारी पूर्ण

मतमोजणीची तयारी पूर्ण

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या शुक्रवार, १६ मे रोजी होणार आहे. अकोल्यातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे ८४ टेबलवर मतमोजणी होणार असून, जिल्हा प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या १० एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पश्चिम, अकोला पूर्व, आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर व रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, त्या अंतर्गत १ हजार ७७४ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानानंतर अकोला मतदारसंघातील सात उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून अकोल्यातील मंगरुळपीर रोडवरील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरू होण्यास एक दिवसाचा कालावधी उरला असून, जिल्हा प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची १४ टेबलवर या प्रमाणे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एकूण २५ फेर्‍यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामध्ये आकोट २०, बाळापूर २२, मूर्तिजापूर २५, अकोला पश्चिम १७, अकोला पूर्व २२ व रिसोड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ फेर्‍यांमध्ये होणार आहे. मतमोजणीच्या २५ फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर, निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणी ८४ टेबलवर करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक टेबलवर एक मतगणना पर्यवेक्षक, एक मतगणना सहाय्यक व एक स्थायी निरीक्षक या प्रमाणे ८४ टेबलवर एकूण २५२ मतगणना अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

**दोन टेबलवर होणार टपाली मतमोजणी!

       मतमोजणीच्या ठिकाणी ८४ टेबल व्यतिरिक्त दोन स्वतंत्र टेबलवर टपाली मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर दोन टेबलवर ही मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक टेबलवर १ मतगणना पर्यवेक्षक, २ मतगणना सहाय्यक व १ स्थायी निरीक्षक या प्रमाणे दोन टेबलवर एकूण ८अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Preparation for counting is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.