Pre-paid autorickshaw service soon from the Akola railway station! | अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा!
अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा!अकोला : अकोला रेल्वेस्थानकाहून लवकरच प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा सुरू होणार असल्याची माहिती भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. अकोल्यातील वातानुकूलित प्रतीक्षालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले होते. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यातील विकासासंदर्भात गुप्ता यांना विचारणा केली असता, त्यांनी ही प्री-पेड सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. या सेवेसोबतच दोन लिफ्ट आणि स्वयंचलित पायरीच्या जिन्यासोबतच रेल्वेस्थानकावर सौंदर्यीकरणाच्या अनेक सुविधा लवकरच येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील वातानुकूलित प्रतीक्षालयाच्या लोकार्पणासाठी गुप्ता आले होते. अकोल्यातील स्वच्छतेच्या समस्येबाबतचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. रेल्वेस्थानकावरील दुचाकी आणि चारचाकी पार्किंगची व्यवस्था पुन्हा विस्कळीत झाल्याची कबुली डीआरएम यांनी देत यामध्ये लवकरच सुधारणा होणार असल्याचे सांगितले.
स्टेशन परिसरात आणि स्टेशनच्या बाहेरच्या परिसरात जातीने लक्ष देण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी येथे दिले. नवीन फूट ओव्हर ब्रीजजवळ पार्किंगची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी येथे केली. मध्य रेल्वे लाइनला दक्षिण मध्य रेल्वे लाइनने जोडण्यासोबतच सर्व सुविधा राहणार असल्याची माहितीदेखील गुप्ता यांनी दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, वसंत बाछुका, अशोक गुप्ता, राजकुमार बिलाला व अ‍ॅड. सुभाष ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. स्वच्छता आणि अनधिकृत वेडिंगप्रकरणी पदाधिकाऱ्यांनी डीआरएम यांना घेरले होते. दोन्ही बाबींकडे लक्ष देऊन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गुप्ता यांनी दिले. दरम्यान, डीआरएम गुप्ता यांनी भुसावळ विभागातील सर्व विभागातील प्रमुखांची झाडाझडती घेत कानउघाडणी केली.

Web Title: Pre-paid autorickshaw service soon from the Akola railway station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.