पीआरसीने फोडला घाम!
By Admin | Updated: June 3, 2017 02:03 IST2017-06-03T02:03:18+5:302017-06-03T02:03:18+5:30
बार्शीटाकळी येथील प्रकार : प्रश्नावलीतील पूर्ण प्रश्नांचे मिळाले अर्धेच उत्तर

पीआरसीने फोडला घाम!
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी/ सायखेड: गेल्या दोन महिन्यांपासून पीआरसीचा धसका घेऊन आपल्या शासकीय जबाबदारीची जाणीव ठेवत सर्व रेकॉर्ड ‘अपडेट’ ठेवूनही अखेर पीआरसीने प्रश्नावाली सूचीनुसार पंचायत व्यवस्थेचा आढावा घेताना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना पं. स. व जि. प. च्या अधिकाऱ्यांना घाम फोडल्याचा अनुभव २ जून रोजी बार्शीटाकळी येथे आला.
विविध योजना, त्यावरील खर्च यासह शिक्षण, लघुसिंचन आदी विभागाचा लेखाजोखा घेताना पंचायतराज समितीचे प्रमुख आ. रामहरी रूपनवर यांनी प्रशासन अधिकाऱ्यांची चांगलीच परेड घेतली. पं. स. सभागृहातील बंद खोलीत तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या आढावा बैठकीमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे देताना ‘होय सर, नाही सर, रेकॉर्ड उपलब्ध करून देतो सर’ हेच शब्द वारंवार ऐकायला मिळाले.
अन्यथा बीडीओंना जबाबदार धरू
शासनाचे कर्मचारी म्हणून काम करीत असताना पं. स. स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेतील निधीमध्ये जर अपहार झाल्याचे सिद्ध झाल्यास अशा कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून अपहारातील रक्कम वसूल केली जाते. असे गैरव्यवहार करून शासनाचे पैसे बिनव्याजी वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तीन महिन्यात अपहारातील व लेखा परीक्षणादरम्यान आढळलेल्या फरकाची रक्कम वसूल करा. अन्यथा बीडीओंना जबाबदार धरू, असे समितीप्रमुखांनी निर्देशित केले.
स्वत:ची मुले इंग्रजी शाळेत अन् गरिबाच्या मुलांचे काय?
पीआरसीने शिक्षणविषयक आढावा घेतला असता विद्यार्थी पटसंख्येत होत असलेल्या चढ-उताराला शिक्षक जबाबदार आहेत. स्वत:ची मुले इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, तर दुसऱ्यांची मुले जि. प. च्या शाळेत शिकतात. त्यांना धड इंग्रजी व गणिताचे पाढे बरोबर येत नाहीत. ही सुधारणा शिक्षकाने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे समिती प्रमुखांनी सुचविले. तालुक्यातील १३६ पैकी ५५ जि. प. शाळा डिजिटल झाल्याची माहिती घेताना पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना मिळालेले आयएसओ मानांकन व डिजिटल झालेल्या अंगणवाड्या याचा आदर्श समोर ठेवून काम करण्याचे सुचविले.
धाबा ग्रामपंचायतीला भेट
पीआरसीची बार्शीटाकळी पं. स. मधील आढावा व तपासणी बैठक संपन्न झाल्यावर समितीने २१ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आदर्श गाव धाबा ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान सुसज्ज इमारत पाहून आश्चर्यचकीत झालेले समितीप्रमुख आ. रामहरी रुपनवर यांनी मौखिक आयएसओ मानांकित असल्याचे मत मांडले. ग्रा. पं. च्या कामकाजाबाबत उत्पन्न वाढीबाबत व संगणकीकृत प्रणालीबाबत माहिती ग्रामविकास विभाग सचिवाने घेतली. शेरा बुकमध्ये भेटीची नोंद करताना धाबा ग्रा. पं. चे कार्यालय अतिशय सुंदर असून, माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या प्रयत्नातून हे साकार झाले आहे, असे पथक प्रमुखांनी म्हटले आहे.
यांचा होता समावेश
या पथकामध्ये अध्यक्ष आ. रामहरी गोविंदराव रूपनवार, सदस्य आ. रवींद्र वामनराव नजरधने, आ. कृष्णा धमाजी गजबे, ग्रामविकास उपसचिव ना. भा. रिंगणे, मुख्य लेखा वित्त अधिकारी गीता नागर, प्रतिवेचक प्रकाश गागरे, कार्यकारी अभियंता देशमुख, शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. के. व्ही. मेहरे, एस. एन. कुळकर्णी आदींचा समावेश होता. गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे, विविध विभागाचे प्रमुख तथा तत्कालीन गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, कान्हेरी सरपची तपासणी केली.